देशातील मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल आता परदेशी कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. भारती एअरटेलची प्रमोटर भारती टेलिकॉमनं ४ हजार ९०० कोटी रूपयांच्या परदेशी गुंतवणुकीसाठी दूरसंचार विभागाची परवानगी मागितली आहे. दूरसंचार विभागाकडून कंपनीला परवानगी मिळाल्यास भारती एअरटेल ही परदेशी दूरसंचार कंपनी बनणार आहे. असं झाल्यास भारती टेलिकॉममध्ये परदेशी शेअरहोल्डिंग ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार आहे. एका वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
अहवालानुसार, भारती टेलिकॉमने सिंगापूरच्या सिंगटेल आणि इतर काही परदेशी कंपन्यांकडून गुंतवणूक वाढवण्यासाठी मंजुरीसाठी अर्ज केला आहे. दूरसंचार विभागाकडून याच महिन्यात भारती एअरटेलला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी दूरसंचार विभागानं भारती एअरटेलचा अर्ज नामंजुर केला आहे. दरम्यान, त्यावेळी परदेशी गुंतवणुकदाराचं नाव स्पष्ट नसल्यानं भारती एअरटेलचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता.
सध्या भारती टेलिकॉममध्ये सुनिल भारती मित्तल आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ५२ टक्के हिस्सा आहे. तसंच भारती टेलिकॉमकडे एअरटेलचे ४१ टक्के शेअर्स आहेत. तर परदेशी प्रमोटर होल्डिंग २१.४६ टक्के आहे. तर ३७ टक्के शेअर्स हे सामान्य गुंतवणुकदारांकडे आहेत. भारती एअरटेलमध्ये परदेशी गुंतवणुकदारांचे शेअरहोल्डिंग ४३ टक्के आहे. भारती टेलिकॉमचे स्वामित्व परदेशी कंपन्यांकडे गेल्यानंतर एअरटेलमधील परदेशी गुंतवणुकदारांचा हिस्सा वाढून तो ८४ टक्के होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांनी सुयोग्य महसुली उत्पन्न दाखविण्यात कसूर केल्याचा सरकारच्या दूरसंचार विभागाचा दावा ग्राह्य़ धरला गेला आणि मागील १४ वर्षांपासूनची महसुली थकबाकी आणि दंड मिळून ९२,००० कोटी रुपये चुकते करण्यास फर्मावण्यात आले आहे. सरकारच्या दाव्यानुसार, गणना करण्यात आलेली थकीत ९२,००० कोटी रुपयांची देणी तीन महिन्यांच्या आत अदा केली जावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. तशा प्रकारची मागणी करणाऱ्या नोटिसा दूरसंचार खात्याकडून या कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने विक्रमी तोटय़ाने ग्रस्त दूरसंचार कंपन्यांना दिलासा देताना, ध्वनीलहरी शुल्काचा भरणा त्यांना दोन वर्षे विलंबाने करण्याची मुभा दिली. तथापि या रकमेवर जितका काळ विलंब केला, तितक्या कालावधीसाठी व्याज मात्र या कंपन्यांना भरावा लागणार आहे.