भारतात कोविड-१९ या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रतिदिन करोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात येत असून गुरुवारी भारतात करोना चाचण्यांनी नवा उच्चांक गाठला. चोवीस तासात ९ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी चोवीस तासात ९,१८,४७० करोना चाचण्या करण्यात आल्या असून आजवर दिवसभरात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या ठरल्या आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३.२६ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, देशाचा करोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याचा दर घसरला असून तो ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सातत्याने करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत असल्याने पॉझिटिव्हीटीचा दर कमी झाला आहे. विविध राज्ये सध्या दहा लाख लोकसंख्येच्या मागे दिवसभरात १४०हून अधिक करोना चाचण्या करीत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, सुरुवातीला चाचण्यांच्या वाढत्या प्रमाणाबरोबर पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणही वाढत होते. मात्र, अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अवलंबलेल्या उपायोजनांच्या अनुभवावरुन असे लक्षात आले आहे की, करोनाच्या चाचण्या वाढवण्याबरोबरच तत्काळ आयसोलेशन, परिणामकारक ट्रॅकिंग आणि वेळेत वैद्यकीय व्यवस्थान या गोष्टी एकाच वेळी होत असल्याने करोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी होत आहे.

देशात करोना चाचण्या करणाऱ्या लॅबचा विस्तार झाल्याने तसेच परिणामकारकरित्या सोप्या पद्धतीने चाचण्यांसाठी उपाययोजना केल्याने सध्याचे आकडे समोर येत आहेत. देशात ९७७ सरकारी लॅब सुरु करण्यात आल्या आहेत. तर ५१७ खासगी लॅब आहेत. त्यामुळे देशात सध्या एकूण लॅबची संख्या १,४९४ इतकी झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Testing in india has steeply increased to more than 9 lakh tests per day says health ministry aau