Thalapathy Vijay Rally Stampede: करुर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेता विजय आणि त्यांच्या तमिलगा वेत्री कझगम पक्षाबद्दल कठोर शब्दांत टिप्पणी केली. या सुनावणीत, न्यायमूर्ती एन सेंथिलकुमार यांनी आयपीएस अधिकारी आसरा गर्ग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले, तसेच पक्षाच्या बेजबाबदार वर्तनावर ताशेरे ओढले.

“एक माणूस म्हणून, मी चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंबद्दल शोक व्यक्त करतो. न्यायाधीश म्हणून, इतके जीव गमावताना पाहणे वेदनादायक आहे”, असे न्यायमूर्ती सेंथिलकुमार म्हणाले.

“तुम्ही काय कारवाई केली? तुम्ही हे घडू दिले आणि आता म्हणता की फक्त दोघांना अटक करण्यात आली आहे. यासाठी जबाबदार कोण? नेता, विजय बेपत्ता झाला, पळून गेला. लोकांना मदत करण्यासाठी कोणीही थांबले नाही”, असे न्यायमूर्ती सेंथिलकुमार पुढे म्हणाले.

सार्वजनिक सभांबाबत न्यायालयाची कठोर भूमिका

याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने सार्वजनिक सभांबाबतही कठोर भूमिका घेतली आहे. मदुराई खंडपीठाने म्हटले आहे की, महामार्गांजवळ आता मोठ्या सार्वजनिक सभा घेता येणार नाहीत. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, जिथे सभा आयोजित केल्या जातात तिथे पिण्याचे पाणी आणि शौचालये यासारख्या मूलभूत सुविधा नेहमी उपलब्ध असाव्यात.

तमिळनाडूतील करूर येथे तमिळगा वेत्री कझगम पक्षाचा प्रमुख अभिनेता विजयच्या सभेत अलीकडेच झालेल्या चेंगराचेंगरीशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने हा आदेश दिला. मदुराई खंडपीठाचे न्यायाधीश एम. धंडापाणी आणि एम. ज्योती रमण यांनी शुक्रवारी हा अंतरिम आदेश दिला.

चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू

२७ सप्टेंबर रोजी विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये १० मुलांसह ४१ जणांचा मृत्यू झाला होता. यासह शेकडो लोक जखमी झाले आहेत. विजयच्या पक्षाने मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. शिवाय, तामिळनाडू सरकारने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.