कर्नाटकात सध्या मोठ्याप्रमाणात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. परदेश दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री कुमारस्वामी बंगळुरात दाखल झाले असुन, त्यांनी तातडीने जेडीएसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे काँग्रेसने देखील आपल्या सर्व आमदारांसाठी परिपत्रक काढले असुन, ९ जुलै रोजी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर भाजपाने देखील त्यांच्या आमदरांसाठी बंगळुरातील रामदा हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी ३० खोल्या आरक्षित केल्या आहेत.

कर्नाटक काँग्रेसच्या बैठकीत कर्नाटक काँग्रेस प्रभारी केसी वेणुगोपाल आणि कर्नाटक काँग्रेस प्रमुख दिनेश गुंडू हे देखील उपस्थित राहणार आहेत. शिवाय परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, जे आमदार या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी बंगळुरात पोहचतास सर्वात अगोदर काँग्रेस नेते वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते जेडीएस कार्यालयात जाणार आहेत. तर भाजपाने देखील सोमवारी सायंकाळी ५ वाजता पक्ष कार्यालयात आमदरांची बैठक आयोजीत केली आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मंत्री मंडळातील शिक्षण मंत्री जीटी देवेगौडा यांनी म्हटले आहे की, जर माझ्या पक्षाचे म्हणने असले तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र मी भाजपाबरोबर जाणार नाही. आमचे युतीचे सरकार राज्याच्या भल्यासाठीच आहे. जेडीएसच्या मुख्यालयात त्यांनी सांगितले की, मी एच विश्वनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. जर दोन्ही पक्ष ठरवत असतील की सिद्धरमय्या मुख्यमंत्री व्हावे किंवा अन्य कोणी मला काहीच अडचण नाही.

जर समन्वय समितीने ठरवले आहे की, सिद्धारामायांनी मुख्यमंत्री व्हावयला पाहिजे, तर आम्हाला कोणतेही आक्षेप नाही. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यांनी सदस्यांना सांगितले आहे की, काही वरिष्ठांनी कॅबिनेटमधून राजीनामा द्यावा आणि इतरांसाठी मार्ग तयार करावा.