आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माउंट एव्हरेस्टवर मात्र परिणाम न झाल्याचा दावा,  येत्या काही दशकात नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाची शक्यता

आशियात १५०० मैल परिसरात विस्तारलेल्या हिमालयाच्या काही पर्वत शिखरांची उंची कमी तर काहींची जास्त झाल्याचा परिणाम नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या भूकंपानंतर दिसून आला आहे. गेल्या ५ कोटी वर्षांत म्हणजे भूगर्भशास्त्रानुसार पापणी लवण्याइतक्या काळात हिमालयामध्ये भूकंपामुळे पर्वतशिखरांच्या उंचीत बदल झाले आहेत. प्रादेशिक प्रस्तरभंग रेषा संशोधकांनी शोधली असून ती नेपाळमध्ये भूपृष्ठाखाली खोलवर आहे. ज्या ठिकाणी दाब जास्त असतो तेथे पुन्हा प्रस्तरभंग होऊन भूकंपाचा धोका असतो ही रेषा अजून पूर्णपणे दुभंगली नसल्याने येत्या काही दशकात नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाची व ज्वालामुखीच्या उद्रेकाची शक्यता आहे.

नेपाळच्या भूकंपानंतर हिमालयाच्या काही शिखरांची उंची ६० से.मी. इतक्या अंतराने कमी झाली आहे, तरी माउंट एव्हरेस्टच्या बाबतीत फार परिणाम झालेला नाही. माउंट एव्हरेस्ट हा जगातील उंच पर्वत मानला जातो. वैज्ञानिकांनी प्रगत उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्व नेपाळमध्ये भूकंपानंतरच्या बदलांचे मापन केले असता हिमालयातील काही शिखरांची उंची नेपाळ भूकंपाच्या पहिल्या काही सेकंदातच खाली आल्याचे दिसून आले.

माउंट एव्हरेस्ट भूकंपाच्या क्षेत्रात पूर्वेकडे ५० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्याने त्याच्यावर काही परिणाम झाल्याची शक्यता कमी आहे. वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने नेपाळमध्ये एप्रिल २०१५ मध्ये ८ हजार बळी घेणाऱ्या भूकंपाचा पर्वतशिखरांच्या उंचीवर झालेला परिणाम अभ्यासला आहे. ब्रिटनचे सेंटर फॉर द ऑब्झर्वेशन अँड मॉडेलिंग ऑप अर्थक्वेक्स, व्होल्कॅनोज व टेक्टॉनिक्स या संस्थेच्या वैज्ञानिकांनी हा अभ्यास केला असून त्यांच्या मते भूकंप होण्याच्या आधी व नंतर गिरिशिखरांच्या उंचीत फरक होत जातो. त्यात हिमालयाचा समावेश आहे. यात २० किमी खोलीवर जेव्हा हालचाली होतात तेव्हा पर्वतशिखरांची उंची भूकंप नसताना वाढते. नेपाळमध्ये अनेक उंच पर्वत आहेत. ते लाखो वर्षांत भारत व आशिया प्लेटच्या आघाताने बनले आहेत. पण पर्वतांची उंची केव्हा वाढते व केव्हा कमी होते याबाबत वाद आहेत असे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे जॉन इलियट यांनी सांगितले. नेपाळमध्ये २० कि.मी. खोलीवर लहरींमुळे काही भाग वर फेकला जाऊन पर्वतांची उंची भूकंपाआधीच्या काही दशकात वाढलेली दिसते, पण नंतर भूकंपानेच पर्वतांची उंची कमी झालेली आहे. एप्रिल २०१५ च्या भूकंपात हे दिसून आले असे जर्नल नेचर जिओसायन्स नियतकालिकातील संशोधन निबंधात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The height difference between the peaks of himalayas in after the earthquake of nepal