Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. एवढंच नाही तर जगातील अनेक देशांवर ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादलेलं आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा नायजेरियाकडे वळवल्याचं दिसून येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियावर संभाव्य लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. नायजेरियात सतत ख्रिश्चनांच्या हत्येच्या घटना घडत असून नायजेरिया सरकार त्यासाठी परवानगी देत ​​असल्याचा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे नायजेरियातील ख्रिश्चन धर्माला अस्तित्वाचा धोका असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

तसेच अमेरिकेने नायजेरियाला परराष्ट्र विभागाच्या विशेष वॉचलिस्टमध्ये (Special Watchlist) टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलवर लिहिलं की, “नायजेरियात हजारो ख्रिश्चनांची हत्या होत आहे. कट्टरपंथी शक्ती त्यांच्याविरुद्ध नरसंहार करत आहे. आता अमेरिका नायजेरियाला विशेष चिंतेचा देश घोषित करत आहे आणि ही फक्त सुरुवात आहे.”

तसेच ट्रम्प यांनी असंही जाहीर केलं की जर नायजेरियातील परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिका नायजेरियाला मिळणारी सर्व मदत तात्काळ थांबवेल आणि लष्करी हस्तक्षेपाचे निर्देश देईल. ट्रम्प म्हणाले की, ‘त्यांनी संरक्षण विभागाला ज्याला ‘युद्ध विभाग’ म्हणून संबोधलं जातं, संभाव्य कारवाईसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि असा इशारा दिला आहे की अमेरिकेचा कोणताही हल्ला गंभीर असेल.’

ट्रम्प म्हणाले की, “मी आमच्या युद्ध विभागाला संभाव्य कारवाईसाठी तयारी करण्याचे निर्देश देत आहे. जर आम्ही हल्ला केला तर तो हल्ला गंभीर आणि क्रूर असेल. जसे दहशतवादी गुंड आमच्या प्रिय ख्रिश्चनांवर हल्ला करतात.” दरम्यान, नायजेरियातील धार्मिक हिंसाचाराच्या घटनांवरून वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.