नेमकी, सुसंगत माहिती देण्याचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आवाहन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीटीआय, न्यूयॉर्क : ‘कॅनडामध्ये खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असण्याची शक्यता आहे’, या जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपाला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी प्रथमच जाहीर उत्तर दिले. ‘हे भारत सरकारचे धोरण नाही’, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. तसेच कॅनडाकडे याविषयी काही नेमकी, सुसंगत माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी असेही त्यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केल्यानंतर जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र संबंधविषयक परिषदेमध्ये अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत केनेथ जस्टर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांविषयी तुम्हाला काही म्हणायचे आहे का असा प्रश्न जस्टर यांनी विचारला. त्यावर जयशंकर म्हणाले की, ‘एक, आम्ही त्यांना सांगितले की हे भारत सरकारचे धोरण नाही. दोन, आम्ही सांगितले की तुमच्याकडे याविषयी काही नेमकी, सुसंगत माहिती असेल तर ती आम्हाला द्या. त्याचा तपास करण्यास आम्ही तयार आहोत’. 

जयशंकर पुढे म्हणाले की, या सर्व गोष्टी संदर्भानीच समजून घेणे आवश्यक आहे. कारण संदर्भाशिवाय संपूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये कॅनडामध्ये फुटीरवादी शक्ती, संघटित गुन्हे, हिंसा, मूलतत्त्ववाद यांच्याशी संबंधित संघटित गुन्हेगारी वाढली आहे. या सर्व गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. भारताने त्याविषया कॅनडाला बरीच माहिती दिली आहे. भारतालाही नेमकी तथ्ये आणि माहिती मिळाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. ‘फाइव्ह आईज गटा’मध्ये याबद्दल माहितीची देवाणघेवाण झाली या चर्चेबद्दल, ‘मी त्यांचा भाग नाही’, असे सांगून त्यांनी काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला.

‘भारत-रशिया संबंध अतिशय स्थिर’

भारत आणि रशियादरम्यानचे संबंध अतिशय स्थिर असल्याचे जयशंकर यांनी या संवादादरम्यान स्पष्ट केले. तसेच हे द्विपक्षीय संबंध कायम टिकवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. सोव्हिएत रशियाच्या काळापासून आणि त्यानंतरही भारत-रशिया संबंध स्थिर आहेत असे ते म्हणाले.

अमृतकाळ आणि जागतिक महासत्तापदाकडे वाटचाल

पुढील २५ वर्षांचा काळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार केलेला अमृतकाळ असून यादरम्यान भारत विकसित देश होण्यासाठी आणि जागतिक महासत्ता होण्यासाठीही प्रयत्न करेल असे जयशंकर या संवादादरम्यान म्हणाले. सध्या भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून आमचे हितसंबंध, जबाबदाऱ्या, योगदान वाढले आहे असे त्यांनी सांगितले.

तिथे काय सुरू आहे हे समजून घेण्यासाठी या सर्व गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. त्यांना राजकीय कारणांमुळे परवानगी मिळत असल्याची आम्हाला चिंता वाटत आहे. आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या दुतावासांवर हल्ले होत आहेत आणि राजकारणात हस्तक्षेप केल्याचे आरोप केले जात आहेत. – एस जयशंकर, परराष्ट्रमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is not india policy jaishankar first public response to canada allegations ysh