IndiGo Delhi-Srinagar Flight  : राजधानी दिल्ली ते श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानाला खराब हवामानाचा बुधवारी फटका बसला. या प्रतिकूल हवामानाविरोधात सामना करताना विमानातील क्रू मेंबर्सने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश मिळण्याची विनंती केली होती, मात्र पाकिस्तानने ही विनंती नाकारली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

या घटनेबद्दल सविस्तर निवेदनात डीजीसीएने म्हटलंय की, विमानातील कोणत्याही प्रवाशाला कोणतीही दुखापत झालेली नाही. पण विमानाचा पुढचा भाग म्हणजेच नोज रेडोम खराब झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळल्याच्या घटनची डीजीसीए चौकशी करत आहेत.

बुधवारी इंडिगोच्या ए ३२१ निओ विामनाच्या उड्डाण क्रमांक ६ई२१४२ ला पठाणकोजवळ तीव्र खराब हवामानाचा सामना करावा लागला. क्रूने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मार्गावरील खराब हवामानामुळे नॉर्दर्न एअर फोर्स कंट्रोलला डावीकडे वळण्याची विनंती केली होती. परंतु, ती मंजूर करण्यात आली नाही, असं डीजीसीएने सांगितलं. खराब हवामान टाळण्यासाठी क्रू नंतर लाहोरच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी पोहोचले, परंतु तीही विनंती नाकारण्यात आल्याचंही डीजीसीएने सांगितलं. अखेर कसंबसं हे विमान श्रीनगरला उतरवण्यात आलं.

वैमानिकांनी विमान सुरक्षा नियामकाला दिलेल्या निवेदनानुसार, वादळात नेव्हिगेट करताना विमानाने विविध तांत्रिक इशारे दिले. विमानाला येणाऱ्या अपड्राफ्ट आणि डाउन ड्राफ्टमुळे, ऑटोपायलट ट्रिप झाला आणि विमानाच्या गतीमध्ये बराच बदल झाला. परिणामी, कमाल ऑपरेटिंग स्पीड/कमाल ऑपरेटिंग मॅच (VMO/MMO) चेतावणी आणि वारंवार थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कालावधीत, विमानाचा उतरण्याचा दर ८५०० fpm (फूट प्रति मिनिट) पर्यंत पोहोचला. गारपिटीतून बाहेर पडेपर्यंत क्रूने विमान मॅन्युअली उडवले”, असे डीजीसीएने क्रूच्या विधानावर आधारित म्हटले आहे.

विमानात नेमकं काय घडलं?

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, खराब हवामानात अचानक विमानाला अचानक जोरदार धक्के बसत असल्याचे जाणवू लागले आणि त्यामुळे प्रवाशांमध्येही भीती व अस्वस्थता निर्माण झाली, तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, अनेक प्रवासी विमानात भीतीने ओरडू लागले. लहान मुलांना काय घडतेय हे न समजल्याने तेही गोंधळून जोरदार रडू लागले. एकूणच विमानात गोंधळ निर्माण झाला. विजेमुळे विमान हादरले आणि त्यामुळे विमानातील प्रवाशांसह जवळपास सर्वांनाच आपल्याला आता मृत्यूला कवटाळण्याशिवाय गत्यंतर नाही, अशा भीतीने ग्रासले. घाबरलेले प्रवासी जीव वाचविण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करू लागले. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To avoid hailstorm indigo delhi srinagar flight requested iaf lahore atc for route deviation both denied pilots tell dgca sgk