मोदी सरकार सत्तेत आल्यामुळे आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्याची गरज उरली नसल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे. ते शुक्रवारी लखनऊ येथील एका कार्यक्रमात बोलत होते. पुढीलवर्षीच्या उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत अयोध्येतील राम मंदिराचे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. नरेंद्र मोदी सरकार संसदेत कायदा करून अयोध्येत राम मंदिराची उभारणी करेल, अशी आशा आम्हाला वाटत असल्याचे सूचक विधान तोगडियांनी केले. उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकांशी विश्व हिंदू परिषदेला काहीही देणेघेणे नसून राम मंदिर हा काही राजकीय मुद्दा नाही. आंदोलने ही विरोधी पक्ष सत्तेत असताना करायची असतात. मात्र, सध्या केंद्रात आपल्या भाईंचे सरकार असल्यामुळे विहिंपला आंदोलन करण्याची गरज नसल्याचे तोगडिया यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी शिळा दाखल होऊ लागल्या होत्या. रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्या हस्ते त्यांचे शिलापूजनही करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Togadia with modi in power no stir for ram temple needed