इंदोर/खांडवा : मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात गुरुवारी विसर्जनासाठी दुर्गा देवीच्या मूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात तीन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर एकूण ३० भाविक होते. खंडवा जिल्ह्यातील पंधना भागात विविध गावांमधून दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली, असे पोलीस महानिरीक्षक (इंदूर ग्रामीण परिक्षेत्र) अनुराग यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.