तुलसी प्रजापती बनावट चकमकप्रकरणी त्याच्या आईचे मन वळविण्याचे डावपेच आखण्यासाठी आयोजित बैठकीला आपण उपस्थित होतो, हे भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी सीबीआय चौकशीदरम्यान मान्य केले.
या बैठकीचे स्टिंग ऑपरेशन छुप्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने एका पत्रकाराने केले, त्यावेळी जावडेकर उपस्थित असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. जावडेकर यांनी २७ सप्टेंबर रोजी झालेल्या चौकशीच्या वेळी पूर्ण सहकार्य केल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
भाजपचे खासदार भूपेंद्र यादव यांचीही सीबीआयने चौकशी केली आणि भाजपचे सरचिटणीस रामलाल यांनाही पाचारण करण्यात आले आहे. यादव आणि रामलालही या बैठकीला उपस्थित असल्याचे दिसत आहे. सदर तीनही नेत्यांनी कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाचा इन्कार केला आणि आपण निष्पाप असल्याचे सांगितले. प्रजापती याची आई नर्मदाबाई यांनी आपला वकालतनामा बदलावा, यासाठी त्यांची मनधरणी कोणत्या प्रकारे करता येणे शक्य आहे, याची चर्चा हे तीन नेते करीत होते, तेव्हा स्टिंग ऑपरेशन करण्यात आले.