अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याला नुकतेच एक तप पूर्ण झाले असतानाच सोमवारी सकाळी येथील नौदल तळ गोळीबाराच्या आवाजांनी हादरला. राजधानी वॉशिंग्टनपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नौदलाच्या तळावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी सोमवारी हल्ला केला. यात एका हल्लेखोरासह १३ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत.
अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या या ठिकाणावर सोमवारी सकाळी नौदल सैनिकांच्या गणवेशात आलेल्या तीन हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार सुरू केला. यात १३ जण ठार झाल्याचे वॉशिंग्टनच्या पोलीस प्रमुख कॅथी लेनियर यांनी सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तीन हल्लेखोरांपैकी एकाला टिपण्यात सुरक्षायंत्रणांना यश आले. तर अन्य दोघेही परिसरात लपून बसले असल्याने संपूर्ण परिसराला छावणीचे रूप आले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. हा दहशतवादी हल्ला आहे का याबाबत अधिकृत माहिती नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले.
सुरक्षा भेदलीच कशी?
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा या तळावर तीन हजार जण काम करतात. येथे जाण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतचे ओळखपत्र दररोज दाखवावे लागते तसेच प्रत्येक वाहनाचीही कसून तपासणी केली जाते. मात्र हल्लेखोरांनी ही सुरक्षाव्यवस्था भेदली.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2013 रोजी प्रकाशित
अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला; १३ ठार
अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याला नुकतेच एक तप पूर्ण झाले असतानाच सोमवारी सकाळी येथील नौदल तळ गोळीबाराच्या आवाजांनी हादरला.

First published on: 17-09-2013 at 02:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twelve killed in us navy base shooting