रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्ध सहाव्या दिवशी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. यासंदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयानेच दिली आहे. सलग सहाव्या दिवशी रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरुच आहे. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्हवर सुरु असणाऱ्या हवाई तसेच जमीनीवर लष्कराकडून सुरु असणाऱ्या गोळीबारामध्ये एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. खार्कीव्हमध्ये रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात हा भारतीय मुलगा मरण पावलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी खार्कीव्हवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय. दोन ट्विट करत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी, “अत्यंत दु:खाने आम्ही या वृत्ताला दुजोरा देत आहोत की एका भारतीय विद्यार्थ्याचा खार्कीव्ह येथे आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे,” असं म्हटलंय.

परराष्ट्र मंत्रालयाचे परदेश सचिवांनी रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांना फोनवरुन संपर्क केला आहे. भारतीयांना या युद्धग्रस्त शहरांमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने सेफ पॅसेज उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी भारताकडून करण्यात आलीय, असंही बागची म्हणालेत.

किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियन सैन्याचीही आता दमछाक होताना दिसतेय. तरीही रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरु आहे. असाच एक हल्ला आज म्हणजेच युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियाने खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर केलाय. शहरामधील मुख्यचौकात क्षेपणास्त्राने मारा करण्यात आल्याचा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

राजधानी किव्हनंतर सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने बॉम्ब फेकलाय. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झालाय. व्हिडीओत दिसतंय त्याप्रमाणे या शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या अगदी प्रवेशद्वारावर क्षेपणास्त्र पडलं. क्षेपणास्त्र पडताना आगीचे लोळ उठल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

दरम्यान, सोमवारी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांसमोर आपली बाजू मांडताना पुतिन यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियावर गंभीर आरोप केलेत. आम्ही नागरी वस्तीवर हल्ले करत नसल्याचा दावा करणाऱ्या रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेननं केलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine war indian student lost his life in shelling in kharkiv says ministry of external affairs scsg