वॉशिंग्टन : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या व्हाइट हाऊसच्या भेटीमध्ये नेमके काय संभाषण झाले ते जाणून घेणे रोचक ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झेलेन्स्की – पुतिन यांनी २०१४मध्ये युक्रेनचा मोठा भाग, पूर्वेकडील भाग आणि क्रिमिया ताब्यात घेतले. त्याला बरीच वर्षे झाली. मी केवळ बायडेन यांच्याबद्दल बोलत नाही. त्यावेळी बराक ओबामा अध्यक्ष होते, त्यानंतर पुन्हा ओबामा, त्यानंतर ट्रम्प, नंतर बायडेन आणि आता ट्रम्प. देवाच्या आशीर्वादाने ट्रम्प त्यांना थांबवतील. पण २०१४मध्ये कोणीही त्यांनी थांबवले नाही. त्यांनी लोकांना मारले.

ट्रम्प – २०१४? तेव्हा मी नव्हतो.

व्हानस – अगदी बरोबर.

झेलेन्स्की – हो, पण २०१४ ते २२दरम्यान परिस्थिती तशीच होती. सीमाभागात लोक मरत आहेत. कोणीही रशियाला थांबवले नाही. आम्ही त्यांच्याशी खूप वेळा चर्चा केली. मी त्यांच्याशी २०१९मध्ये करार केला. पुतिन, इमॅन्युएल माक्राँ आणि अँजेला मर्केल यांच्याबरोबर मी करार केला. पण रशियाने युद्धविरामाचा करार मोडला. जेडी, ही कोणत्या प्रकारची मुत्सद्देगिरी आहे? तुमच्या बोलण्याचा अर्थ काय होतो?

व्हान्स – तुमच्या देशातील विनाश थांबवणाऱ्या मुत्सद्देगिरीबद्दल मी बोलत आहे. अध्यक्ष झेलेन्स्की, मला असे वाटते की तुम्ही ओव्हल कार्यालयात येऊन अमरिकेच्या माध्यमांसमोर जणू काही खटला चालवत आहात, हे आमचा अनादर करणारे आहे. आता तुमच्याकडे सैन्यभरती सुरू आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अध्यक्षांचे आभार मानायला हवेत.

झेलेन्स्की – तुम्ही युक्रेनला येऊन आमच्या समस्या पाहिल्या आहेत का? एकदा याच.

व्हान्स – मी बातम्या पाहिल्या आहेत. मला माहित आहे की तुम्ही तुमच्या जनतेला एक अपप्रचार करणारा दौरा दाखवत आहात. समस्या तुमच्यात आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही तुमच्या लोकांना लष्करात ढकलत आहात.

झेलेन्स्की – समस्या आहेत…

व्हान्स – आणि तुम्हाला असे वाटते का की ओव्हल कार्यालयात येऊन तुमच्या देशातील विनाश थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमच्या सरकारवर हल्ला करता हे आदर दाखवणारे आहे?

झेलेन्स्की – युद्धादरम्यान सर्वांना समस्या असतात. तुम्हालाही. पण तुमच्याकडे चांगला समुद्र आहे आणि तुम्हाला आता ते नाही पण भविष्यात जाणवेल.

ट्रम्प – त्याबद्दल तुम्हाला काही माहित नाही. आम्हाला काय जाणवेल हे सांगू नका. आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला काय भोगावे लागू शकते हे तुम्ही सांगू नका.

झेलेन्स्की – मी तुम्हाला ते सांगत नाही. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे.

ट्रम्प – कारण काय करायचे हे सांगण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही नाही.

व्हान्स – तुम्ही नेमके तेच करत आहात.

ट्रम्प – आम्हाला काय जाणवेल हे सांगण्याच्या स्थितीत तुम्ही नाही. आम्हाला तेव्हा फार छान वाटेल.

झेलेन्स्की – तुम्हालाही त्याचा परिणाम जाणवेल.

ट्रम्प – आता तुमची स्थिती फार चांगली नाही. तुम्ही स्वत:ला वाईट परिस्थितीत आणून ठेवले आहे.

झेलेन्स्की – युद्धाच्या सुरुवातीपासून…

ट्रम्प – तुमची स्थिती फार चांगली नाही. तुमच्याकडे कोणताही हुकुमी पत्ता नाही. आम्हीच तुमचा हुकुमाचा पत्ता आहोत.

झेलेन्स्की – मी पत्ते खेळत नाही. मी फार गंभीरपणे बोलत आहे. अतिशय गांभीर्याने.

ट्रम्प – तुम्ही पत्ते खेळत आहात. तुम्ही लाखो लोकांच्या जीवाचा जुगार खेळत आहात. तुम्ही तिसऱ्या विश्वयुद्धाचा जुगार खेळत आहात.

झेलेन्स्की – तुम्ही हे काय बोलत आहात?

ट्रम्प – तुम्ही तिसऱ्या विश्वयुद्धाचा जुगार खेळत आहात. आम्ही तुम्हाला समर्थन देऊनही तुम्ही आमचा अनादर करत आहात.

व्हान्स – तुम्ही एकदा तरी आमचे आभार मानले का?

झेलेन्स्की – अनेकदा. आजही.

व्हान्स – नाही, या बैठकीत. तुम्ही ऑक्टोबरमध्ये पेनसिल्व्हेनियाला गेलात आणि आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा प्रचार केला.

झेलेन्स्की – नाही.

व्हान्स – तुम्ही अमेरिकेबद्दल आणि तुमच्या देशाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अध्यक्षांबद्दल कौतुकाचे काही शब्द बोला.

झेलेन्स्की – कृपा करा. तुम्ही युद्धाबद्दल फार मोठ्या आवाजात बोलत आहात.

ट्रम्प – नाही, ते मोठ्याने बोलत नाहीत. तुमचा देश मोठ्या संकटात आहे.

झेलेन्स्की – मी उत्तर देऊ का…

ट्रम्प – नको, नको. तुम्ही खूप बोलला आहात. तुमचा देश मोठ्या संकटात आहे.

झेलेन्स्की – मला माहित आहे.

ट्रम्प – तुम्ही जिंकणार नाही. तुम्हाला जी काही संधी होती ती आमच्यामुळे होती. या संभाषणानंतर झेलेन्स्की यांनी युद्धविराम स्वीकारावा अशी मागणी ट्रम्प यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukrainian president volodymyr zelensky conversation with donald trump in white house zws