Amit Shah on Muslim Population: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलत असताना देशात वाढलेल्या मुस्लीम लोकसंख्येबाबत महत्त्वाचे विधान केले. भारतात मुस्लीम समाजाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे सांगून त्यांनी यामागचे कारणही सांगितले. तसेच पुढे त्यांनी निवडणुकीचाही उल्लेख केला. जे भारतीय नागरिक आहेत, तेच निवडणुकीत मतदान करू शकतात, असेही ते म्हणाले.

पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीमधील एका कार्यक्रमात अमित शाह यांनी लोकसंख्येच्या असमतोलबाबात चिंता व्यक्त केली. “मुस्लीम समाजाची लोकसंख्या २४.६ टक्क्यांनी वाढली आहे. तर हिंदूंची लोकसंख्या ४.५ टक्क्यांनी कमी झाली आहे. ही लोकसंख्या वाढ प्रजनन दरामुळे वाढलेली नाही, हे मला इथे सांगायचे आहे. तर लोकसंख्या वाढीचे कारण घुसखोरी आहे”, असे अमित शाह म्हणाले.

धर्माच्या कारणांमुळे भारताची फाळणी झाली, यावर जोर देताना अमित शाह म्हणाले की, भारताच्या दोन्ही बाजूंना पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी भारतात घुसखोरी होत राहिली. यामुळे भारताच्या लोकसंख्येत मोठे बदल झाले, असे त्यांनी सांगितले.

अमित शाह पुढे म्हणाले, “मी तुम्हाला घुसखोर आणि निर्वासित यांच्यातील फरक सांगतो. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदू लोकसंख्या जितकी कमी झाली, त्यापैकी अनेकांनी भारतात आश्रय घेतला. तसेच भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढीमागे प्रजनन दर हे कारण नसून मुस्लिमांची घुसखोरी कारणीभूत आहे.”

देशात होणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न आता मतदार यादीतही होत आहे. यामुळे संविधानाचा आत्मा हरविण्याची भीती आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार हा फक्त भारतीय नागरिकांनाच असला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.