India On Pakistan Air Strike Khyber Pakhtunkhwa Attacks : पाकिस्तानच्या हवाई दलाने त्यांच्याच खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका गावांवर रविवारी रात्रीच्या सुमारास हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली होती. चिनी बनावटीच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांमधून या गावांवर एकापाठोपाठ एक सहा बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यांमध्ये तब्बल ३० जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. या मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याचंही सांगितलं जातं. पाकिस्तानी लष्कराच्या या कृतीवर पाकिस्तानमधील लोकांकडूनच निषेध व्यक्त केला जात आहे.

पाकिस्तानने त्यांच्याच देशातील एका गावावर केलेल्या हवाई हल्ल्याच्या मुद्यांवरून भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. ‘जर पाकिस्तानला स्वतःच्या लोकांवर बॉम्बहल्ला करण्यातून वेगळा वेळ मिळाला तर त्यांनी आपली अर्थव्यवस्था वाचवावी’, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय राजदूत क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तान सैन्याने खैबर पख्तूनख्वा येथील नागरिकांवर केलेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यागी म्हणाले की, “पाकिस्तानने प्रथम व्हेंटिलेटरवर असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यावर लक्ष केंद्रित करावं. कदाचित पाकिस्तानला जेव्हा स्वतःच्या लोकांवर बॉम्बहल्ला करण्यापासून वेळ मिळेल तेव्हा त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावं.”

त्यागी पुढे म्हणाले की, “या दृष्टिकोनाच्या विरोधात असलेलं एक शिष्टमंडळ भारताविरुद्ध निराधार आणि चिथावणीखोर विधाने करून या व्यासपीठाचा गैरवापर करत आहे. मात्र, आमच्या भूभागाची हाव बाळगण्याऐवजी त्यांनी त्यांच्या बेकायदेशीर कब्जाखालील भारतीय भूभाग रिकामा करून जीवनावश्यक आधारावर अर्थव्यवस्था, लष्करी वर्चस्वाने गोंधळलेली त्यांची व्यवस्था आणि छळाने कलंकित झालेल्या मानवी हक्कांच्या रेकॉर्डला वाचवण्यावर लक्ष केंद्रित करणं कधीही चांगलं.”

पाकिस्तानने आपल्याच प्रांतात हवाई हल्ले का केले?

स्थानिक वृत्तानुसार, पाकिस्तानच्या हवाई दलाने तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेच्या गुप्त ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले केल्याचं सांगितलं जातं. या संघटनेने पाकिस्तानमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली असून, तेथील लोकांना ठार मारले जात आहे. त्यामुळे या संघटनेला नष्ट करण्यासाठी अलीकडच्या काळात पाकिस्तानी सैन्याने या भागातील लष्करी कारवाया वाढवल्या आहेत. रविवारी डेरा इस्माईल खान जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेदरम्यान ‘टीटीपी’च्या सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली.