Scott Bessent On India Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के आयातशुल्क लादलं आहे. ट्रम्प यांच्या या टॅरिफमुळे भारताला अमेरिकेत वस्तू निर्यात करण्यासाठी ५० टक्के टॅरिफ भरावा लागणार आहे. त्यामुळे याचा भारतातील अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर हजारो नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात. दरम्यान, भारत आणि अमेरिकामध्ये व्यापार करार होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. पण ती चर्चा पुढे गेली नसल्याचं बोललं जातं.

यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला एकूण ५० टक्के टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू झालेलं आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारतावर टीका करत आहेत. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, ,असं असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहाय्यकाने भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराबाबत मोठे संकेत दिले आहेत.

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील चांगल्या संबंधाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपल्याला विश्वास आहे की दोन्ही देश एकत्र येतील असं सूचक भाष्य स्कॉट बेसेंट यांनी केलं आहे. त्यांचं हे या विधानामुळे भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

स्कॉट बेसेंट काय म्हणाले?

फॉक्स न्यूजशी बोलताना स्कॉट बेसेंट यांनी भारत आणि अमेरिकेतील टॅरिफ वादावर भाष्य केलं. स्कॉट बेसेंट म्हणाले की, “हे एक गुंतागुंतीचं नातं आहे. ट्रम्प आणि मोदी यांचे खूप चांगले संबंध आहेत. फक्त रशियन तेल खरेदीबाबत काही मतभेद आहेत. भारताच्या स्वातंत्र्य दिनानंतर आयात शुल्काच्याबाबत वाटाघाटी सुरू केल्या होत्या. मात्र, अद्याप कोणताही करार झालेला नाही”, असं स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं.

“करार होण्याची मला अपेक्षा होती. मला वाटलं होतं की भारत करार करणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक असू शकतो. पण त्याऐवजी त्यांनी वाटाघाटी पुढे ढकलल्या आहेत. त्याव्यतिरिक्त रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीचा मुद्दा आहे. ज्याचा त्यांना फायदा होत आहे. या परिस्थितीचे अनेक पैलू आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. शेवटी मला विश्वास आहे की दोन्ही देश एकत्र येतील आणि एकत्र पुढे जातील”, असं सूचक भाष्य स्कॉट बेसेंट यांनी केलं आहे.