उत्तर प्रदेशमधील हरडोई येथे घराची बांधणी करण्यासाठी पाया खोदताना एका व्यक्तीला चक्क २५ लाखांचे दागिने सापडले. गुरुवारी घडलेल्या या घटनेमध्ये सापडलेले दागिने हे १०० वर्षांहून अधिक जुने असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला हे दागिने सापडले आहेत त्याला या दागिन्यांवर मालकी हक्क सांगता येणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

हरडोई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गावामधील एक व्यक्ती घराचे बांधकाम करण्यासाठी पाया बांधण्याच्या उद्देशाने खड्डा खोदत असताना त्याला सोन्या चांदीचे दागिने सापडले. यामध्ये ६५० ग्राम सोने आणि ४.५३ किलो चांदीचा समावेश आहे. हरडोईचे पोलीस अधीक्षक अलोक प्रियदर्शनी यांनी हे दागिने पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती दिली. या दागिन्यांना ऐतिहासिक महत्व असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ते पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. ‘ज्या व्यक्तीला हे दागिने सापडले आहेत ते त्याच्याच मालकीचे असल्याचे कोणतेही पुरावे त्या व्यक्तीकडे नसल्याने दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत,’ असं प्रियदर्शनी यांनी स्पष्ट केले. गावातील व्यक्तीला पाया खोदताना दागिने सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भातील तपास केल्यावर खरोखरच एका व्यक्तीला दागिने सापडल्याची माहिती समोर आली.

यासंदर्भातील माहिती पोलिसांनी ट्विट करुन दिली आहे.

या ट्विटवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

बिचारा

अर्धे तरी द्या

नशीब तुरुंगात नाही टाकलं

त्याला सापडलं तुम्ही घेतलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला गाववाल्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीकडे दागिन्यांसंदर्भात विचारपूस केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्याने दागिने सापडल्याची कबुली दिली. जमीनीखाली सापडणारी प्रत्येक महागडी वस्तू ही सरकारच्या मालकीची असते असं भारतीय ट्रेझर ट्रव्ह कायदा १८७८ मध्ये नमूद करण्यात आले आहे. या कायद्यातील कलम चारप्रमाणे ज्या व्यक्तीला जमीनीखाली महागडी वस्तू सापडेल त्याने जिल्हा महसूल अधिकाऱ्यासमोर ती सादर करणे बंधनकारक असते. याच कायद्यातील ११ व्या कलमानुसार जर कोणत्याच व्यक्तीने या वस्तूंवर दावा सांगितला नाही तर ती वस्तू ज्या व्यक्तीला सापडली आहे तिच्या मालकीची असल्याचे जाहीर केले जाते.