भारत-पाक नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. सरकारच्या मवाळ धोरणामुळेच पाकिस्तान व चीनकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन व भारतीय हद्दीत घुसखोरी होत असल्याची टीका करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. या मुद्दय़ावरून सुरू झालेल्या गोंधळात संसदेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.
भारताचे पाच जवान शहीद झाल्याच्या वृत्ताने मंगळवार सकाळपासूनच संसदेच्या दोन्ही सभागृहांतील वातावरण तापले. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी सत्ताधारी यूपीएला धारेवर धरले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी भारताच्या सौम्य भूमिकेवर ताशेरे ओढले. पाकिस्तान आणि चीनकडून नियंत्रण रेषेचे वारंवार उल्लंघन होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी भारताने या दोन्ही देशांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान झालेल्या चर्चेत बोलताना केली. पाकिस्तानी दहशतवादी हाफिझ सईदने जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेचा दौरा केला तेव्हाच भारताने सतर्क व्हायला हवे होते. चीन आणि पाकिस्तान यांनी भारताविरुद्ध हातमिळवणी केली काय, हे संरक्षण मंत्र्यांनी सांगायला हवे. चीन आणि पाकिस्तान भारताच्या सैन्यावर बेसावध अवस्थेत हल्ला चढविण्याचा प्रयत्न करीत असून भारताने सतर्कता बाळगायला हवी, असे मुलायमसिंह यादव म्हणाले. चीनची हिमाचल, अरुणाचल आणि उत्तराखंडच्या काही भागांवर नजर आहे. चीनने यापूर्वीही नेहरूंच्या काळात भारताला दगा दिला आहे, याची आठवण मुलायमसिंह यादव यांनी करून दिली.
हल्ल्याचे वृत्त विचलित करणारे असून भारताविरुद्ध पाकिस्तानने सातत्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमच्या सैन्यात, देशात आणि संसदेत पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची कुवत आहे. पण असे प्रत्युत्तर का दिले जात नाही? हल्लेखोर दहशतवादी होते, हे संरक्षण मंत्र्यांना कसे कळले, असे संतप्त सवाल भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केले. सोनिया गांधी यांनी या घटनेवर तीव्र खेद व्यक्त केला आहे. बदला घेताना भारताने पन्नास सैनिक ठार केल्याशिवाय पाकिस्तानला धडा मिळणार नाही, अशी भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानचे  कानावर हात
जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर झालेल्या हल्ल्यात आपल्या लष्कराचा हात असल्याच्या वृत्ताचा पाकिस्तानने नेहमीप्रमाणे इन्कार केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते एजाझ चौधरी यांनी सांगितले की, प्रत्यक्ष ताबा रेषेवर पूँछ क्षेत्रात ज्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले त्यात पाकिस्तानी लष्कर सामील असल्याचा भारतीय प्रसारमाध्यमांचा आरोप आम्हाला मान्य नाही.
२००३ मध्ये झालेल्या शस्त्रसंधी कराराचे आम्ही पालन केलेले आहे व दोन्ही देशांतील विश्वाससंवर्धनासाठी त्या कराराचे पालन आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, लष्करप्रमुख विक्रम सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे दिल्ली येथे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मनमोहन सिंग व पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची पुढील महिन्यात न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राच्या आमसभा अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर भेट होत असून त्यावर आता या हल्ल्याची कृष्णछाया राहील.

शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानी लष्कराने जुलैपासून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याची क्रमवारी अशी :
३ जुलै क पूँछमध्ये सब्जिया
१२ जुलै क जम्मूतील पिंडी
२२ जुलै कप्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक
२७ जुलै कपूँछ व कथुआ जिल्ह्य़ात
यापूर्वी पाकिस्तानी सैन्याने ८ जानेवारीला केलेल्या हल्ल्यात एका भारतीय सैनिकाचे शीर शरीरावेगळे केले होते व दुसऱ्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न केला होता ती घटनाही पूँछ क्षेत्रातच घडली होती.

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत होण्यास आता अडथळे येणार आहेत. पाकिस्तानपुढे मैत्रीचा हात पुढे करता येणार नाही. असेच चालू राहिले तर संवादाची प्रक्रिया होऊ शकणार नाही.
– फारूख अब्दुल्ला, केंद्रीय मंत्री
***
या घटनेने संरक्षण, सुरक्षा व परदेशी धोरणावर विपरीत परिणाम होणार आहेत.
– राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली
***
पाकिस्तानचे हल्ले नेहमीचेच झाले असून त्याला सरकारने सडेतोड उत्तर दिले पाहिजे.
– भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद
***
देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले हेच या घटनेतून स्पष्ट होते.
– गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी</strong>
***
भारताने हे प्रकरण ठामपणे पाकिस्तानपुढे उपस्थित करावे, अशी अपेक्षा आहे.
– भाकपचे गुरुदास गुप्ता
***
भारताने पाकिस्तानबरोबर शांतता वाटाघाटी करण्याचे कारण नाही.
– माजी लष्करप्रमुख शंकर रॉयचौधरी
***
ही गंभीर परिस्थिती असून सरकारने ठोस प्रतिसाद देणे अपेक्षित आहे.
– माजी परराष्ट्र सचिव, ललित मानसिंग

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uproar in parliament over soldiers killed by pak troops