US Deported illegal Indian Amritsar experience : अमेरिकेत बेकादेशीररित्या राहणार्‍या १०४ भारतीयांना विमानाने परत पाठवण्यात आले आहे. यामध्ये पुरूष, महिला यांच्यासह लहान मुलांचा देखील समावेश आहे. बुधवारी पंजाबमधील अमृतसर येथे या भारतीयांना घेऊन अमेरिकेचं C-17 Globemaster हे विमान उतरलं. विमानतळावर या नागरिकांना भेटलेल्या पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांनी या नागरिकांची स्थिती काय होती याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान पंजाब सरकारकडून या १०४ जणांना त्यांच्या त्यांच्या शहरात पाठवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परत पाठवलेल्या अनेकांसाठी ही शरमेची गोष्ट असून ते आपल्या कुटुंबियांना देखील याबद्दल माहिती देण्यास कचरत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वांना बेड्या घालण्यात आल्या होत्या

अमेरिकेतून परत पाठवलेल्या नागरिकांना भेटलेल्या पंजाब सरकारच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, “आम्ही त्यांचा त्यांच्या प्रियजनांशी संपर्क करून दिला असून त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करत आहोत. असं दिसत होतं की त्यांनी बऱ्याच काळानंतर गरम जेवण पाहिलं आहे. आम्ही त्यांना बेकायदेशीर मार्गांनी पाठवणार्‍या एजंट्सची माहिती देखील गोळा करत आहोत. त्यापैकी काही जण एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी युकेमध्ये होते आणि त्या नंतर अमेरिकेत गेले.”

अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानात लहान मुले सोडता सर्वांना बेड्या घालण्यात आल्या होत्या. विमानातून उतरल्यानंतर बहुतांश जण व्यवस्थित होते, पण काही महिलांना मात्र अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

गरम जेवण दिलं अन्…

“आम्ही त्यांना गरम जेवणाची थाळी दिली, ज्यामध्ये दाळ, भात, रोटी आणि भाजी होती. मुलांना बिस्किट, ज्यूस आणि कलरिंग बुक दिले. असं वाचत होतं की त्यांना बऱ्याच काळानंतर गरम आणि ताजं जेवण मिळालं होतं. ट्रॅव्हल एजंटनी त्यांना फसवल्याची अनेकांची भावना होती, काही जण सुरुवातीला त्यांची नावे सांगतानाही कचरत होते. त्यांना या सगळ्याची लाजही वाटत होती,” असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

“ते त्यांचे भयावह अनुभव सांगत होते. काही जणांनी आम्हाला त्यांच्या कुटुंबियांना डिपोर्टेशनबद्दल न सांगण्याची विनंती केली. आम्ही त्यांचे सांत्वन करत आहोत. आम्ही त्यांना पंजाब एनआरआय विंग आणि जिल्हा रोजगार विभागाचे हेल्पलाइन क्रमांक देखील दिले आहेत. आम्ही त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

परदेशात पाठवण्यासाठी लाखोंचा खर्च

पंजाबमध्ये परत पाठवलेल्या नागरिकांच्या पालकांनी सांगितले की त्यांनी अमेरिकेत पाठवण्यासाठी ३० लाख ते ५० लाख रुपये खर्च केले आहेत. अमृतसर येथे परत पाठवलेल्या एका तरुणाच्या आजोबांनी सांगितले की, “माझा नातू फक्त १५ दिवसांपूर्वीच अमेरिकेत गेला होता. मी या निर्णयाच्या बाजूने नव्हतो. त्याला पाठवण्यासाठी कुटुंबियांनी किती पैसे खर्च केले मला माहिती नाही.”

दुसऱ्या एका व्यक्तीच्या नातेवाईकाने सांगितलं की, तो महिनाभरापूर्वीच अमेरिकेत पोहचला होता. “देशात पोहचण्यासाठी ३० लाख रुपये खर्च केल्यानंतर तो तिथे बस चालक बनला. गेल्या १५ दिवसांपासून आमचा त्याच्याशी कोणताही संपर्क नव्हता. पोलीस ठाण्यातून सकाळी आम्हाला फोन आला की तो आज अमृतसर येथे पोहचेल”.

पंजाबचे स्टेट एनआरआय अफेअर्स मंत्री कुलदीप सिंग धालिवाल यांनी सांगितले की, राज्य सरकार महिला आणि पुरुषांना पाठिंबा देईल. “मी १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासमोर हा मुद्दा मांडेन की अमेरिकेत जाण्यासाठी कर्ज घेतलेल्यांचे व्याज माफ करण्यास बँकांना सांगितले जावे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us deported indians official who received us deportees in amritsar says all handcuffed and it seems they have seen hot food after ages rak