US Government Has Shut Down : अमेरिकेत सरकारी शटडाऊन होणं साधारण बाब बनत चालली आहे. १९९५ पासून आतापर्यंत अमेरिकेत सहा वेळा सरकारी शटडाऊन झालं आहे, म्हणजेच सरकारचं कामकाज बंद झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या याआधीच्या कार्यकाळात तीन वेळा अशीच परिस्थिती ओढवली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा सरकारी शट डाऊन झालं होतं.
ट्रम्प यांच्या कार्यकाळातच अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं शटडाऊन झालं होतं. त्यावेळी सलग ३५ दिवस सरकारचं कामकाज पूर्णपणे बंद होतं. दरम्यान, मंगळवारी (३० सप्टेंबर) मध्यरात्रीपासून अमेरिकन सीनेटने सरकारचा निधी पुरवठा बंद केला आहे. यामुळे तिथे शटडाऊन झालं आहे. याआधी २२ डिसेंबर २०१८ ते २५ जानेवारी २०१९ पर्यंत सलग ३५ दिवस अमेरिकेत शटडाऊन झालं होतं.
२० वर्षांत सहा वेळा सरकारी शट डाऊन
मागील २० वर्षांमध्ये अमेरिकेत सहा वेळा सरकारी शट डाऊन झालं आहे. त्यापैकी तीन वेळा एकट्या ट्रम्प यांच्या कार्यकाळात ही स्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात ३५ दिवसांव्यतिरिक्त जानेवारी २०१८ मध्ये तीन दिवस आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये एक दिवस सरकारी शट डाऊन झालं होतं. ट्रम्प यांच्या आधी बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात दोन वेळा शट डाऊन झालं होतं. १९९५ मध्ये क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात २१ दिवसांसाठी अमेरिकन सरकारचं काम बंद झालं होतं. याआधी त्यांच्याच कार्यकाळात ५ दिवसांसाठी शट डाऊन झालं होतं.
शट डाऊनचं कारण काय?
अमेरिकन सीनेटने मंगळवारी रात्री निधी विधेयकाला मंजुरी न दिल्याने अमेरिकेत सरकारी कामकाज बंद होण्याच्या मार्गावर होतं. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्यानंतर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली. अखेर काही वेळाने शटडाऊन झालं. सीनेटमध्ये ५५-४५ मतांच्या फरकाने विधेयक फेटाळून लावण्यात आलं. ज्यामुळे आवश्यक सरकारी सेवा थांबल्या. याचा हवाई प्रवासापासून ते आर्थिक अहवाल व लहन व्यवसायांच्या कर्जांपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होणार आहे.
सभागृहाचं अधिवेशन चालू नसल्याने आणि रिपब्लिकन व डेमोक्रॅट्समध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड होण्याची आशा नसल्याने यावर तोडगा निघणं अवघड दिसतंय. सीनेटचे रिपब्लिक नेते जॉन थ्यून म्हणाले, “विधेयक पारित करण्यासाठी आठवड्याच्या अखेरीस पुन्हा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे जवळपास साडेसात लाख सरकारी कर्मचाऱ्यांना रजा दिली जाण्याची अपेक्षा आहे. तर, काही कर्मचाऱ्यांना ट्र्म्प प्रशासन नोकरीवर काढून टाकू शकतं.”