US TikTok Ban News : शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टिकटॉक ॲपवर अनेक देशात बंदी आहे. भारताने देखील २०२० मध्ये टिकटॉक ॲपवर बंदी घातलेली आहे. अमेरिकेत देखील टिकटॉकवर बंदी घालण्यात आलेली आहे. अमेरिकेत टिकटॉकवरील बंदीचं प्रकरण तर थेट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. दरम्यान, आता चिनी टिकटॉकबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
अमेरिकेत चिनी टिकटॉकला आता नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातील डील झाल्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी संकेत दिले की टिकटॉकला अमेरिकन बाजारपेठेत काम सुरू ठेवण्यासाठी चीनबरोबर डील झाली आहे. तसेच त्यांच्या प्रशासनाने चिनी अॅपला अमेरिकेच्या मालकीच्या अटींचं पालन करण्यासाठी १७ सप्टेंबरची अंतिम मुदत दिली होती, असं म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी या संदर्भात अधिक तपशील सांगितलेले नाहीत. मात्र, ट्रुथ सोशलवर पोस्टमधून सूचक भाष्य करत संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी म्हटलं की, एका विशिष्ट कंपनीबाबतही तोडगा निघाला, ज्याला आपल्या देशातील तरुण वाचवू इच्छित होते. तसेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी शुक्रवारी आपण याबाबत संवाद साधणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
तसेच युरोपमध्ये अमेरिका आणि चीन यांच्यातील मोठी व्यापार बैठक खूप चांगली झाली आणि ती लवकरच संपेल, असंही ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, याबाबत व्यापार करारासाठी दोन्ही बाजूंनी चर्चा होत असताना चीनकडून कोणतीही पुष्टी मिळाली नाही. मात्र, या अजेंड्यात सोशल मीडिया दिग्गज कंपनीचे भवितव्य समाविष्ट होतं अशी माहिती समोर आली आहे.
चिनी TikTok ला अमेरिकेत बंदी का आहे?
अमेरिकन सरकारकडून चिनी टिकटॉक अॅपची मालकी चीनी हातांमध्ये असण्यास विरोध केला जात आहे. याच भूमिकेचा एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात हे अॅप अमेरिकेत पूर्णपणे बंद करण्यात आले होते. अमेरिकेने अॅपची मालकीच्याबाबत चीनला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिलेली मुदत वाढवली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांना TikTok आवडतं!
दरम्यान, अमेरिकन सरकारने टिकटॉकसंदर्भात स्पष्ट भूमिका घेतलेली असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र TikTok आवडत असल्याची माहिती समोर काही दिवसांपूर्वी आली होती. ल्युटनिक यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी उल्लेख केला होता. मात्र, त्याचवेळी TikTokबाबत अमेरिकेचा प्रस्ताव चीननं स्वीकारला नाही, तर हे अॅप लवकरच अमेरिकेत बंद होईल, असा इशाराही ल्युटनिक यांनी दिला होता.