India On Donald Trump Meet Asim Munir : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जातं. एका देशाचे लष्करप्रमुख आणि एका देशाचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट झाल्यामुळे काय चर्चा झाली असेल? या भेटीमागचं कारण काय? असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, पाकिस्तानच्या प्रमुखांऐवजी लष्करप्रमुख राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
असिम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. या संदर्भात बोलताना भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी म्हटलं की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यातील व्हाईट हाऊसमधील भेट ही पाकिस्तानसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं.”
मुनीर आणि ट्रम्प यांची भेट ही वेगळी मानली जात आहे. कारण एखाद्या देशाच्या लष्करप्रमुखांना अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी विशेष आमंत्रित केलं होतं. या भेटीतून हे दिसून आलं की शेजारच्या देशातील निर्णय पाकिस्तानी लष्कर घेते. त्यामुळे ट्रम्प आणि मुनीर यांच्या भेटीत बद्दल माझं काही चांगलं मत नाही. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. लष्करप्रमुखांना आमंत्रित केलं जातं आणि पंतप्रधान कुठेच दिसत नाहीत? हे कोणत्याही देशासाठी लाजिरवाणे असेल. ही खूप विचित्र गोष्ट आहे”, असं संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी एएनआयशी बोलताना म्हटल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
पाकिस्तानने नोबेल पुरस्कारासाठी सुचवलं ट्रम्प यांचं नाव
पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं आहे. विशेष म्हणजे नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सुचवण्यामागचं कारण देखील पाकिस्तानने सांगितलं आहे. भारत-पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्याचं श्रेय पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना देत त्या कारणास्तव ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केल्याचं सांगितलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीसाठी महत्त्वपूर्ण हस्तक्षेप केल्याचं सांगत संकटादरम्यान त्यांच्या निर्णायक राजनैतिक सहभाग आणि निर्णायक नेतृत्वाचं कौतुक केलं. तसेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांशी संवाद साधून उत्तम धोरणात्मक दूरदृष्टी दाखवली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे शस्त्रसंधी झाली, ज्यामुळे एक विनाशकारी संघर्ष टळला, असं पाकिस्तानने एका औपचारिक निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, जागतिक पातळीवर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सुचवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आताच पाकिस्तानशी जवळीक का?
मनीकंट्रोलमधील एका लेखानुसार, भारत-पाक या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष थांबवल्याचा पोकळ दावा ट्रम्प यांनी केल्यानंतर असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांची जागतिक पातळीवरील प्रतिमा चांगली करण्यासाठी याचा लाभ होऊ शकतो. तर दुसरं कारण म्हणजे, इराण-इस्रायल युद्धात तेहरानच्या (इराणची राजधानी) जवळ असलेला पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले, “त्यांचे (पाकिस्तानी नेतृत्व) इराणशी चांगले संबंध आहेत. सध्या जे काही चाललं आहे, ते पाकिस्तानला पटलेलं नसून ते माझ्याशी सहमत आहेत.”