वृत्तसंस्था, रियाध
सौदी अरेबियाने अमेरिकेमध्ये ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चार दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर असून मंगळवारी ते सौदी अरेबियामध्ये दाखल झाले. त्यावेळी सौदी अरेबियाचे अलिखित राज्यकर्ते युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचे दिमाखदार स्वागत केले. दोन्ही नेत्यांदरम्यान गुंतवणूकविषयक चर्चा सुरू होण्यापूर्वी, आम्ही एकमेकांना पसंत करतो असे मला वाटते अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली.
अमेरिका आणि सौदी अरेबियादरम्यान ऊर्जा, संरक्षण, खनिकर्म आणि अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्याविषयी करार करण्यात आले. त्यावर मोहम्मद बिन सुलेमान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार, अमेरिकेने सौदी अरेबियाला जवळपास १४२ अब्ज डॉलर मूल्यांच्या शस्त्रांस्त्रांच्या विक्री करण्याचे मान्य केले. व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने कोणत्याही देशाबरोबर केलेला हा सर्वात मोठा संरक्षण सहकार्य करार आहे. या कराराअंतर्गत अमेरिकेच्या दहापेक्षा जास्त संरक्षण कंपन्या हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण, हवाई दल व अवकाश प्रगती, सागरी सुरक्षा व दूरसंचार या क्षेत्रांमध्ये व्यापार करणार आहेत.
आम्हाला ६०० अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या संधींची आशा आहे. त्यापैकी ३०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करारावर आम्ही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
मोहम्मद बिन सलमान, सौदी अरेबियाचे युवराज