US Wants India as Ally in Trade War : अमेरिका व चीनमधील व्यावसायिक तणाव पुन्हा वाढला आहे. चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातील बंदी घातल्यानंतर अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट म्हणाले की “वॉशिंग्टनला भारत, युरोप आणि आशियातील लोकशाही राष्ट्रांकडून पाठिंबा अपेक्षित आहे.” एका मुलाखतीत बेसंट म्हणाले, “ही चीन विरुद्ध जग अशी लढाई आहे. या लढाईत वॉशिंग्टनला अनेक राष्ट्रांकडून पाठिंब्याची गरज आहे.”

स्कॉट बेसंट म्हणाले, “चीनने वैश्विक पुरवठा साखळीवर आणि जागतिक औद्योगिक रचनेवर बंदूक रोखली आहे. परंतु, ते आम्हाला आदेश देवू शकत नाही आणि ते आम्हाला नियंत्रितही करू शकणार नाहीत. या स्थितीत अमेरिका आपल्या सार्वभौमत्त्वाचं रक्षण करेल.

अमेरिका व चीनमध्ये वाढता तणाव

अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी आरोप केला आहे की “चीन सातत्याने प्रक्षोभक कृत्ये करतोय. एका बाजूला अमेरिका जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न करत असताना चीन मात्र युद्धाला निधी पुरवत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेटीआधी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणं ही चीनची मोठी चूक ठरेल.” डोनाल्ड ट्रम्प व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण कोरियामध्ये भेटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बेसंट यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अमेरिकेने चीनवर लादलं ५५ टक्के आयात शुल्क

अमेरिकेच्या अध्यक्षांनी अलीकडेच चीनवर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची धमकी दिली होती. येत्या १ नोव्हेंबरपासून हे टॅरिफ लागू करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. ट्रम्प यांनी हे वक्तव्य केल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. मात्र, रविवारी ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता करू नका, सगळं काही ठीक होईल. आम्ही चीनची मदत करू इच्छितो. आम्हाला चीनचं कुठलंही नुकसान करायचं नाही. सध्याच्या घडीला अमेरिका चिनी उत्पादनावर ५५ टक्के आयात शुल्क आकारतेय. हे शुल्क वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसऱ्या बाजूला ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे दंडात्मक कारवाई म्हणून आम्ही हे पाउल उचललं असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

दुर्मिळ खनिजांवर चीनचं नियंत्रण

चीन हा जगातील तब्बल ७० टक्के दुर्मिळ खनिजांचे खाणकाम आणि ९० टक्के प्रोसेसिंग क्षमता नियंत्रित करतो. ही दुर्मिळ खनिजे प्रामुख्याने संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टरसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात वापरली जातात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की चीनच्या या वर्चस्वामुळे पुढील काही महिन्यांत जागतिक पुरवठा साखळीत (सप्लाय चेन) मोठे बदल होऊ शकतात.