USA Travel Advisory for Tourists : गेल्या आठवड्यात काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने जम्मू-काश्मीरसाठी लेव्हल ट्रॅव्हल अॅडव्हायजरी (प्रवाशांसाठी सूचना) जारी केली आहे. अमेरिकेने प्रवाशांना (पर्यटकांना) सावधगिरीचा सल्ला दिला आहे. तसेच जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून अशांत वातावरण आहे. त्यामुळे लेह-लडाखवगळता काश्मीर व जम्मूमध्ये फिरायला जाणं टाळा असं म्हटलं आहे. अमेरिकन पर्यटकांना श्रीनगर, गुलमर्ग, पहलगामला न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या बाजूला जगभरातील अशा काही देशांची यादी अमेरिकेने जारी केली आहे जिथे त्यांच्या नागरिकांनी जाऊ नये असं ट्रम्प सरकारला वाटतं. ट्रम्प सरकारकडून २१ देशांची ‘नो गो झोन’ यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर एप्रिल-मे महिन्यात या देशांमध्ये प्रवास करू नका अशा मथळ्याखाली २१ देशांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत पूर्वी १९ देश होते, ज्यामध्ये दोन देशांची भर घालण्यात आली आहे.
चार श्रेणींमध्ये देशांची वर्गवारी
अमेरिकेने जारी केलेल्या ट्रॅव्हल अॅडव्हायजरीमध्ये एकूण चार श्रेणी आहेत. यापैकी पहिल्या श्रेणीतील देशांमध्ये जाताना खबरदारी घ्या, दुसऱ्या श्रेणीतील देशांत जाताना अधिक खबरदारी घ्या, तिसऱ्या श्रेणीतील देशांत जाण्याबाबत पुनर्विचार करा, चौथ्या श्रेणीतील देशांत जाऊच नका, असं म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरला जाताय? अधिक खबरदारी घ्या; अमेरिकेची प्रवाशांना सूचना
शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर लोक पर्यटनाला जातात. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार अमेरिकन पर्यटक भारतात येऊ शकतात, सर्वत्र फिरू शकतात. मात्र, भारतातील जम्मू-काश्मीर हा भाग दुसऱ्या श्रेणीत ठेवण्यात आला आहे. येथे जाताना अधिक खबरदारी घ्या अशी सूचना अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना दिल्या आहेत. तसेच अमेरिकेने २१ देशांची यादी जाहीर केली आहे जिथे न जाण्याच्या सूचना त्यांनी आपल्या नागरिकांना दिल्या आहेत.
‘या’ २१ देशांमध्ये जाऊ नका, अमेरिकन सरकारचा पर्यटकांना सल्ला
- ब्रह्मदेश (म्यानमार)
- अफगाणिस्तान
- बेलारूस
- दक्षिण सुदान
- हैती
- इराण
- इराक
- उत्तर कोरिया
- लेबनॉन
- लीबिया
- माली
- रशिया
- सोमालिया
- सुदान
- सीरिया
- युक्रेन
- वेनेझुएला
- येमेन
- बुकिना फासो
- सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन (मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक)
- डेमोक्रेटिक रिबल्बिक ऑफ काँगो (काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक)