Uttarakhand Private Chopper Crash : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्रीकडे जाणारे एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ८ मे २०२५ रोजी घडली होती. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील गंगणी जवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) आता या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या हेलिकॉप्टरचा अपघात नेमकं कसा आणि कशामुळे झाला? याची माहिती एएआयबीच्या अहवालातून आता समोर आली आहे.
या अहवालानुसार, हे ४०७ हेलिकॉप्टर ८ मे रोजी आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करत होतं. मात्र, त्याचवेळी हेलिकॉप्टर त्याच्या मुख्य रोटरसह ओव्हरहेड फायबर केबलला धडकलं आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता, तर अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरचा मुख्य रोटर ओव्हरहेड फायबर केबलला धडकल्याने झाला होता, ज्यामुळे आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला” असं अहवालात म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
एएआयबीच्या अहवालानुसार, हेलिकॉप्टर त्याच्या निर्धारित उंचीवरून खाली येण्यास सुरुवात करण्यापूर्वी सुमारे २० मिनिटे हवेतच होतं. तसेच ६ हजार १६० तासांच्या उड्डाणाचा अनुभव असलेल्या ५९ वर्षीय वैमानिकाने गंगणी जवळ उत्तरकाशी-गंगोत्री रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न देखील केला. पण आपत्कालीन लँडिंग करत असताना हेलिकॉप्टर अचानक ओव्हरहेड फायबर केबलला धडकल्याने अपघात झाला. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि हेलिकॉप्टरचंही मोठ्या प्रमाणात नुसान झालं होतं, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.
अहवालात असंही म्हटलं की, “अमेरिकेतील राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) आणि कॅनडातील वाहतूक सुरक्षा मंडळ (TSB) यांनी अपघाताच्या तपासात मदत करण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी आणि तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. तपास पथक अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील पावले उचलण्यासाठी काम करत आहे. विविध भागधारकांकडून मिळवलेल्या नोंदींची तपासणी केली जात आहे.”