Indian Man Heckled In Australia: ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरितांविरुद्धच्या मोर्चात भाषण करताना एका भारतीय व्यक्तीला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये एक ऑस्ट्रेलियन व्यक्ती आंदोलकांना वक्त्याची ओळख करून देत असल्याचे दिसून येत आहे. “आपला पुढचा पाहुणा एक परदेशी आहे. तो परदेशी दिसतो आणि तो म्हणाला की त्याला बोलायचे आहे,” असे सूत्रसंचालक प्रेक्षकांना सांगतो, तेव्हा सर्वत्र घोषणाबाजी सुरू होती.
स्टेजवर पोहचताच, या भारतीय व्यक्तीला आंदोलकांच्या विरोधाची जाणीव झाली. “हो, मी एक कृष्णवर्णीय व्यक्ती आहे. हो, मी भारतातून आलेला स्थलांतरित आहे. मी योग्य कारणांसाठी येथे आलो आहे”, असे तो म्हणतो. यावर आंदोलक त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
या भारतीय व्यक्तीने त्याच्या भाषणात, असा युक्तिवाद केला की, “स्थलांतर म्हणजे घेण्याबद्दल नाही तर देण्याबद्दल आहे. मागणी करण्याबद्दल नाही तर आदर करण्याबद्दल आहे. पण आज मी जे काही पाहतोय, ते स्थलांतर नाही. ही एक ‘ओपन डोअर’ पॉलिसी आहे. कोणीही येऊ शकते, जागा मागू शकते आणि ऑस्ट्रेलियाने त्यांच्यासाठी बदल करावा अशी मागणी करू शकते. ते आपल्या संस्कृतीत मिसळत नाहीत, ते आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करत नाहीत. ते त्याचा दुरोपयोग करत आहेत.”
दरम्यान, हा भारतीय व्यक्ती भाषण करत असल्याना अचानक एक आंदोलक स्टेजवर येऊन, त्याला धक्का देऊन माईक हिसकावून घेतो. दरम्यान या घटनेला ऑस्ट्रेलियन सरकारने अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
रविवारी सिडनी आणि मेलबर्नसह प्रमुख शहरांमध्ये आयोजित “मार्च फॉर ऑस्ट्रेलिया” रॅली दरम्यान ही घटना घडली होती. या मोर्चाला हजारो लोक उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने वृत्त दिले आहे की, सिडनी रॅलीमध्ये सुमारे ८,००० लोक उपस्थित होते. मेलबर्नमध्ये, या मोर्चातील आंदोलक आणि पॅलेस्टाईन समर्थकांची झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, “तो खरा भारतीय व्यक्ती असू शकतो ज्याने खरोखरच आपले मार्ग स्वीकारले आहेत आणि आपल्या संस्कृती आणि श्रद्धांचा आदर करतो. हे जर खरे असेल तर मी त्याचे कौतुक करतो. तो बरोबर बोलत होता. पण दुर्दैवाने त्याचे बरेच देशबांधव आणि महिला येथे मोठ्या संख्येने आले आहेत आणि आपली संस्कृती आत्मसात करण्यास नकार देत आहेत. यामुळे काही चांगले लोकही बदनाम होत आहेत.”