Video Of Stone Inscription With Ashoka Pillar Vandalized At Hazratbal Dargah: जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. या दर्ग्यामधील शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे आज मोठा वाद झाला आणि यानंतर संतप्त जमावाने तो शिलापट फोडला. दर्ग्यात कोणत्याही प्रकारची प्रतिमा बसवता येणार नाही असे जमावाचे म्हणणे आहे.
जमावाने आरोप केला की, मशिदीत पुतळ्यासारखी वस्तू बसवण्यात आली आहे, जी इस्लामच्या विरोधात आहे आणि त्यामुळे त्यांनी अशोक चिन्ह असलेला शिलापट फोडला. हा संगमरवरी शिलापट दोन दिवसांपूर्वी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. दारक्षण अंद्राबी यांनी उद्घाटनादरम्यान बसवला होता.
दरम्यान, या घटनेत संतप्त जमावाने केलेल्या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जमाव वक्फ बोर्डाने लावलेल्या शिलापटावर कोरलेला अशोक स्तंभ दगडाने फोडताना दिसत आहे. जम्मू आणि काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा दारक्षण अंद्राबी यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
दारक्षण अंद्राबी म्हणाल्या की, ज्यांनी ही घटना घडवून आणली ते एका पक्षाचे गुंड आहेत. या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल कारण त्यांनी मोठा गुन्हा केला आहे.
दारक्षण अंद्राबी यांनी आरोप केला की, जमावाने त्यांच्यावरही हल्ला केला आहे. या जमावाने राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करून मोठा गुन्हा केला आहे. त्यांनी दर्ग्याच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचवली आहे. या घटनेतील आरोपींची ओळख पटल्यानंतर त्यांना आजीवन दर्ग्यात प्रवेश बंदी केली जाईल आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असेही सांगितले.