गेल्या काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेला हिंसाचार पराकोटीला पोहोचला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थनार्थ हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं. त्याचं रुपांतर दंगलीत झालं. आता या दंगलीचं रुपांतर जाळपोळ आणि लुटालुटीत झालं आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमधला असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या चिमुकलीला वाचवण्यासाठी थेट इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकत असल्याचं दृश्य दिसत आहे. दंगलीच्या परिणामांचं हे विदारक दृश्य बघणाऱ्यांचं काळीज पिळवटून टाकणारं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
आगीमुळे आपल्या चिमुकलीला छतावरून खाली सोडणं या माऊलीला भाग पडलं! (फोटो सौजन्य – Nomsa Maseko यांच्या ट्वीटर हँडलवरील व्हिडीओमधून)

सोशल मीडियावर अनेक जणांनी हा व्हिडीओ शेअर करून दक्षिण आफ्रिकेत निर्माण झालेल्या परिस्थितीवर खेद व्यक्त केला आहे. सर्वप्रथम बीबीसीचे कॅमेरामन थुथुका झोंडी यांनी हा व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये नलेडी मानयोनी नावाची एक महिला एका दुकानाच्या छतावरून आपल्या चिमुकलीला खाली फेकताना दिसत आहे. ती उभी असलेल्या दुकानाच्या इमारतीला मोठी आग लावण्यात आली आहे.

 

सर्वात आधी इमारतीतून कुणीतरी नलेडी यांच्याकडे अशाच प्रकारे त्या २ वर्षांच्या चिमुकलीला सोपवलं. कसंही करून आपल्या मुलीला वाचवायचं या हेतूने झपाटलेल्या नलेडी यांनी खाली उभ्या असलेल्या काही स्थानिकांना आवाज दिला. काही लोक तिच्या मदतीसाठी धावले. मोठ्या हिकमतीने नलेडी यांनी दुकानाच्या छतावरून आपल्या मुलीला खाली सोडलं. व्हिडीओमध्ये दिसतंय त्यावरून छताची उंची किमान १२ ते १५ फूट असावी. पण पाठिशी आग वाढत असल्यामुळे नलेडी यांनी खाली उभ्या असलेल्या जमावावर विश्वास ठेऊन मुलीला खाली सोडलं.

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी सरसावले शेकडो हात (फोटो सौजन्य – Katlie Moo यांच्या ट्विटरवरील व्हिडीओमधून)

खाली उभ्या असलेल्या लोकांनी देखील नलेडी यांना मुलीला वाचवण्याबाबत आश्वस्त केलं. नलेडी यांनी २ वर्षांच्या आपल्या चिमुकलीला खाली सोडलं. खालच्या लोकांनीही तिला अलगद झेललं. यानंतर काही वेळाने स्वत: नलेडी देखील स्वत:चा बचाव करून खाली आल्या. त्या म्हणाल्या, “मी माझ्या मुलीला जेव्हा जवळ घेतलं, तेव्हा ती सारखी रडत रडत मला म्हणत होती, आई तू मला खाली फेकलंस! ती घाबरली होती.”

 

या प्रकाराविषयी नंतर नलेडी यांनी बीबीसीसोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. नलेडी राहात असलेल्या १६ मजल्यांच्या इमारतीखालील दुकानांना समाजकंटकांनी आग लावून दिली होती. आधी त्यांनी खालची दुकानं लुटली आणि त्यानंतर पेटवून दिली. आगीमुळे लिफ्ट चालत नव्हती. त्यामुळे त्या जिन्यांनी १६ मजले उतरून खाली आल्या. पण आगीमुळे तळमजल्यावर पोहोचू शकल्या नाही. दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीमधून त्या खालच्या दुकानाच्या छतावर उतरल्या. तिथून त्यांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी खाली उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेनं सोडलं.

 

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना पदावर असतानाच अटक करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ सुरू केली आहे. जोहान्सबर्ग, डर्बन अशा मोठ्या शहरांमध्ये असलेली मोठमोठी दुकानं लुटून त्यांना आगी लावण्याचे अनेक प्रकार घडू लागले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video mother throws daughter down in south africa during riot after jecob zuma arrested pmw