Jaisalmer Bus Fire: राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी एका खासगी बसमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण गंभीर जखमी आहेत, एकूण ५७ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. सदर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची तर जखमींसाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या बसला लागलेल्या आगीचा भीषण असा व्हिडीओ समोर आला आहे.
“राजस्थानमधील जैसलमेर येथील बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो आहे. या संकट काळात बाधित झालेले लोक आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी मंगळवारी रात्री केलेल्या एक्स पोस्टमध्ये दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या वारशांना दोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान या दुःखद घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये भररस्त्यात जळत असलेली बसत दिसत आहे. काही लोक मदत करण्यासाठी पुढे सरसावले होते. मात्र आग भीषण असल्यामुळे प्रवाशांना वाचवता आले नाही. या बसमध्ये एकूण ५७ प्रवासी होते. दुपारी ३ वाजता जोधपूरहून बस निघाली होती. जोधपूर-जैसलमेर महामार्गावरून प्रवास करत असताना चालकाला बसमध्ये आग लागल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला बस थांबवली. पण तोपर्यंत बसने पेट घेतला होता.
जैसलमेर में भीषण हादसा: चलती AC बस बनी आग का गोला, 15 से ज़्यादा यात्रियों की ज़िंदा जलकर दर्दनाक मौत #JaisalmerBusFire #Jaisalmer #RajasthanNews pic.twitter.com/pp9xxxMsTl
— Amaresh yadav (@AmareshLive) October 14, 2025
जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी सर्व जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी, असे निर्देश दिले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी केली. बचाव आणि मदत कार्य करणाऱ्या लष्करी जवानांचे आणि स्थानिक रहिवाशांचे त्यांनी आभार मानले. घटनेची तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्री शर्मा यांनी पाटण्यातील नियोजित प्रचार कार्यक्रम रद्द केला.