महिला शिक्षिका सुरक्षारक्षकाला काठीने मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरक्षारक्षक शांतपणे उभा असताना महिला त्याला शिवीगाळ करत, काठीने मारहाण करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. सुरक्षारक्षक परिसरातील कुत्र्यांना नीट वागणूक देत नसल्याने महिलेने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आग्रा येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

ही घटना आग्रा पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला असणाऱ्या एलआयसी ऑफिसर कॉलनीत घडली आहे. शनिवारी संध्याकाळी, सुरक्षारक्षक श्वानांना सोसायटीतून बाहेर काढत असताना महिलेने त्याच्याशी वाद घातला. कुत्र्यांना ठार मारलं जात असल्याचा आरोप महिलेने केला. यावेळी महिला इतकी संतापली की तिने काठीने त्याला मारहाण केली. यावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करण्यात आली.

“तू कुत्र्यांना मारणार, तुझ्यासारखे *** फार पाहिले आहेत. याला पोलीस ठाण्यात घेऊन चला,” असं महिला बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

पोलिसांनी घेतली दखल

पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. आग्रा पोलिसांनी व्हिडीओ ट्विट केला असून यामध्ये पोलीस अक्षिधक विकास कुमार यांनी गुन्हा दाखल केला असून, योग्य ती कारवाई केली जाई अशी माहिती दिली आहे.

सुरक्षारक्षक निवृत्त जवान

अखिलेश सिंह असं या सुरक्षारक्षकाचं नाव असून ते निवृत्त जवान आहेत. एलआयसी ऑफिसर कॉलनीत ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. “रस्त्यावरील श्वान सोसायटीत घुसून परिसर अस्वच्छ करतात. त्यांनी कॉलनीतील काही लोकांवर हल्लाही केला आहे. अशा स्थितीत आपण त्यांना आतमध्ये प्रवेश करु देत नाही,” असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.