गेल्या दोन दिवसांपासून रशियामध्ये अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तणाव निर्माण झाला होता. खुद्द राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीच उभ्या केलेल्या वॅग्नर या समांतर सैन्यगटानं पुतिन यांच्याचविरोधात बंड केलं होतं. या गटाचा प्रमुख प्रिगोझिननं थेट देशाला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची घोषणाही करून टाकली होती. रशियन सैन्य आणि वॅग्नर ग्रुपचे सैनिक यांच्यातील वादाचं रुपांतर अवघ्या रशियावर अंतर्गत विध्वंसाची टांगती तलवार निर्माण होण्यामध्ये झालं होतं. मात्र, अखेर दोन्ही बाजूंनी झालेल्या वाटाघाटींनंतर वॅग्नर नरमले असून रशियातील संभाव्य विध्वंस टळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिगोझिनला कारवाईपासून अभय

एपी न्यूजच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, वॅग्नर ग्रुपचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन आणि रशियाच्या बाजूने वाटाघाटी करणारे बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांड ल्युकाशेंको यांच्यातील चर्चा यशस्वी ठरली आहे. ही चर्चा पूर्ण होताच प्रिगोझिननं मॉस्कोच्या दिशेनं आगेकूच करणाऱ्या आपल्या सैन्याला थांबण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रशियात होणारा संभाव्य विध्वंस टळल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. या चर्चेनुसार प्रिगोझिनवर कोणताही खटला चालवला जाणार नसून त्याला बेलारूसला विनाअडथळा पाठवण्यास व्लादिमीर पुतिन तयार झाले आहेत.

Wagner Group Retreat: रशियातून वॅग्नरची माघार; कसा व कोणत्या अटींवर झाला तह? वाचा सविस्तर!

मॉस्कोजवळ पोहोचले होते वॅग्नर

ही चर्चा होण्याआधी प्रिगोझिनचा वॅग्नर ग्रुप थेट रशियाची राजधानी मॉस्कोच्या अवघ्या २०० किलोमीटरहून कमी अंतरावर पोहोचला होता. ही चर्चा यशस्वी झाली नसती, तर आत्तापर्यंत वॅग्नर ग्रुप मॉस्कोमध्ये घुसला असता. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन रशियन सैन्यानंही मॉस्कोमध्ये तयारी केली होती. रशियन सैन्य वॅग्नर ग्रुपचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलं होतं. मात्र, ही चर्चा यशस्वी ठरल्यामुळे प्रिगोझिननं वॅग्नर ग्रुपला मॉस्कोमध्ये घुसण्याच्या आधीच थांबण्याचे आदेश दिले आहेत.

विश्लेषण: ‘वॅग्नर ग्रुप’चा भस्मासुर रशियावरच उलटणार? भाडोत्री लष्कराचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ!

…म्हणून प्रिगोझिनला सोडलं, रशियाचं स्पष्टीकरण

दरम्यान, प्रिगोझिन आणि त्याच्या वॅग्नर ग्रुपनं गेल्या दोन दिवसांपासून रशियामध्ये घातलेल्या धुमाकुळानंतर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं खुद्द पुतिन यांनीच जाहीर केलं होतं. मात्र, माघार घेण्याचा निर्णय प्रिगोझिननं जाहीर करताच पुतिन यांनी आपली भूमिका बदलली आहे. प्रिगोझिनला विनाआडकाठी बेलारूसला जाऊ देण्यास पुतिन तयार झाले असून त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असंही पुतिन यांनी जाहीर केलं आहे. “रशियामध्ये रक्तपात आणि अंतर्गत लढा होऊ नये हेच पुतिन यांचं सर्वोच्च ध्येय होतं. म्हणून त्यांनी प्रिगोझिन आणि त्याच्या सैन्याला जाऊ दिलं”, असं स्पष्टीकरण पुतिन सरकारकडून देण्यात आलं आहे.

विशेष संपादकीय : पुतिन यांचे वॅग्नेर-वांधे!

नेमकं काय ठरलं?

रशियातील आपली कारवाई थांबवण्यासाठी प्रिगोझिननं आदेश दिले असले, तरी बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या चर्चेमध्ये काही अटी ठरवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, प्रिगोझिनवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. प्रिगोझिनच्या सैन्यालाही कारवाईपासून अभय देण्यात येईल. प्रिगोझिन बेलारूसमध्ये जाईल, तर त्याचं सैन्य त्यांच्या आधीच्याच युक्रेनमधल्या तळावर पुन्हा हजर होईल, अशा काही अटी ठरवण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wagner group in russia holds march before moscow prigokhin to move belarus pmw