Washington DC plane crash : अमेरिकेत ६४ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान अमेरिकन लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. वॉशिंग्टन डीसीतील रेगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर हे विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीच्या परिसरात कोसळले असून, बचाव कार्य सुरू आहे. याबाबत अमेरिकेच्या विमान वाहतूक प्रशासनाने माहिती दिली आहे. या अपघातानंतर पोटोमॅक नदीत ३० प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकन एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त फ्लाइट ५३४२ मध्ये ६० प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. या विमानाने कॅन्ससच्या विचिटा येथून उड्डाण केले होते. दरम्यान या अपघातात लष्करी हेलिकॉप्टरचा समावेश असल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसने दुजोरा दिला आहे. दरम्यान अपघातानंतर, रेगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे आणि लँडिंग स्थगित करण्यात आले आहेत.

ट्रम्प म्हणाले अपघात रोखता आला असता

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या अपघाताबाबतची माहिती देण्यात आली आहे.” दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये विमान अपघात रोखता आला असता असे म्हटले आहे आणि कंट्रोल टॉवरच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट.

“अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत,” असे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया अग्निशमन आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज संध्याकाळी रेगन विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातातील सर्व पीडितांसाठी प्रार्थना करा. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.”

या विमान आणि हेलिकॉप्टर अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानाच्या रेडिओ ट्रान्सपॉन्डरमधील डेटावरून असे दिसून येते की, जेव्हा विमान पोटोमॅक नदीवरून जात होते तेव्हा ते सुमारे ४०० फूट उंचीवर आणि सुमारे १४० मैल प्रति तास वेगाने होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Washington dc plane crash reagan national airport american eagle flight 5342 sikorsky helicopter aviation incident aam