Pakistan Vs Afghanistan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये ११ आणि १२ ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात संघर्ष उफाळून आला होता. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले होते आणि सीमावर्ती भागांतील चौक्यांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर अफगाणिस्ताननेही पाकिस्तानच्या अनेक सीमावर्ती तळांवर हल्ला करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यानंतर कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर कतारच्या दोहा या ठिकाणी शांतता चर्चा पार पडल्या. मात्र, अद्याप दोन्ही देशांकडून ठोस असा तोडगा निघालेला नाही. कतार आणि तुर्की हे दोन्ही देश शांतता चर्चेसाठी प्रयत्न करत आहे. मात्र, असं असतानाच तालिबान आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा खटके उडत आहेत. त्यामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान शांतता चर्चा अयशस्वी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असं असतानाच मंगळवारी तुर्कीमधील शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीला मोठा इशारा दिला आहे. ‘आम्ही तालिबान राजवट नष्ट करू शकतो’ अशी धमकीच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी काय म्हटलं?
“आम्ही तालिबान राजवट पूर्णपणे नष्ट करू शकतो. तालिबान राजवट नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या संपूर्ण शस्त्रागाराचा एक छोटासा भाग देखील वापरण्याची आवश्यकता नाही. तालिबानला पुन्हा गुहांमध्ये परत पाठवण्यासाठी आमच्या सर्व शस्त्रास्त्राचा एक भाग देखील पुरेसा आहे. तालिबान राजवटीत युद्धखोरांनी पाकिस्तानचं धाडस आणि दृढनिश्चय चुकीचा समजलं. पण जर तालिबानला लढायचं असेल तर जगाला दिसेल की त्यांचे दावे फक्त बनावट आणि खोटे आहेत”, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.
मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी काय म्हटलं?
पाकिस्तान सरकारमधील मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी बुधवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये या संदर्भात बोलताना म्हटलं की, “दोन्ही देशांमधील चर्चेचा कोणताही निष्कर्ष निघाला नाही, कारण अफगाणिस्तानने कोणतंही आश्वासन दिलं नाही, मुख्य मुद्द्यापासून अफगाणिस्तान दूर जात आहे. त्यामुळे अद्याप तरी कोणताही व्यवहार्य तोडगा निघू शकला नाही.”
अफगाणिस्तानने काय प्रतिक्रिया दिली?
पाकिस्तान-अफगाणिस्तान शांतता चर्चांबाबत काबूलच्या बाजूने कोणतीही थेट प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की, “पाकिस्तानी शिष्टमंडळाने अशा मागण्या मांडल्या ज्या दोन्ही बाजूंना मान्य नव्हत्या.”
