Asaduddin Owaisi On Pakistan PM Shehbaz Sharif : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पण त्यानंतरही पाकिस्तानमधील काही नेते भारताविरोधात गरळ ओकत आहेत. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे वेगवेगळी विधाने करत भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या नेत्यांकडूनही जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिल्याच्या मुद्यावरून आज एक विधान करत धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या विधानाला खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी असदुद्दीन ओवैसी हे पाकिस्तानवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. ‘आमच्याकडेही ब्रह्मोस आहे’, असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानी नेत्यांना थेट इशारा दिला.
असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?
शाहबाज शरीफ यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं की, “आमच्याकडेही ब्रह्मोस आहे. त्यामुळे शेहबाज शरीफ यांनी अशा पद्धतीचं मूर्खपणाचं बोलू नये. अशा धमक्यांचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. आता खूप झालं”, असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
#WATCH | Hyderabad, Telangana | On Pakistan PM Shehbaz Sharif's reported "enemy cannot snatch even a single drop of water from Pakistan" statement, AIMIM MP Asaduddin Owaisi says, "'BrahMos hai humaare paas'… He should not talk such nonsense… Such threats will have no effect… pic.twitter.com/NfCxYM6Mo8
— ANI (@ANI) August 13, 2025
शाहबाज शरीफ यांनी काय विधान केलं होतं?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली. यावर टीका करत असताना शाहबाज शरीफ म्हणाले की, आमच्या देशाचा पाण्याचा एकही थेंब शत्रूला आमच्यापासून आम्ही हिरावू देणार नाही. आम्ही शत्रू राष्ट्राला सांगू इच्छितो की, तुम्ही जर आमचे पाणी रोखण्याची धमकी देत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पाकिस्तानच्या वाट्याचा एक थेंबही तुम्ही पाकिस्तानपासून हिरावू शकत नाहीत. जर पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असा धडा शिकवू की पुन्हा असे कृत्य करण्याचा विचारही करणार नाहीत.”
असीम मुनीर यांनीही दिली होती धमकी
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेतील टाम्पा शहरात बोलताना म्हटलं होतं की, “आता जर संघर्ष सुरु झाला तर भारताच्या पूर्व भागापासून सुरुवात करत आपण पश्चिमेच्या दिशेने जाऊ. मुकेश अंबानी यांची जामनगरमध्ये रिफायनरी आहे. ती जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे. या रिफायनरीवर हल्ला करु. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश आहे. आम्हाला बुडवण्याचा प्रयत्न झाला तर आम्हीही अर्धे जग घेऊन बुडू. पहिला हल्ला रिलायन्सच्या जामनगरमधील रिफायनरीवर करण्यात येईल.”
असीम मुनीर यांच्या विधानालाही असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर
असीम मुनीर यांच्या धमकीसंदर्भात बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं होतं की, “पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे शब्द आणि त्यांच्या धमक्या निंदनीय आहेत. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते अमेरिकेत बसून बोलत आहे. अमेरिका भारताचा धोरणात्मक भागीदार आहे. तरीही असीम मुनीर हे सडकछाप माणसाप्रमाणे बोलत आहेत. आपल्याला हे देखील समजून घेणं आवश्यक आहे की पाकिस्तानी लष्कराकडून आणि त्यांच्या काही राज्याकडून आपल्याला कायम धोका राहू शकतो. त्यामुळे आपल्याला आपलं संरक्षण बजेट वाढवावं लागेल, जेणेकरून आपण तयार राहू शकू”, असं खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं होतं.