Iran-Israel War : गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्रायल संघर्ष सुरु होता. मात्र, अमेरिकेने मध्यस्थी करत युद्धसमाप्तीची घोषणा केली. त्यामुळे हा संघर्ष काहीसा निवाळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण इराण-इस्रायल संघर्षात अमेरिका सहभागी होत इराणमधील तीन आण्विक तळांवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात इराणमधील तीन आण्विक तळ नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेचा हा हावा फेटाळून लावला.
पण अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या आण्विक तळांचं किती नुकसान झालं? खरंच अमेरिकेच्या हल्ल्यात आण्विक तळ नष्ट झाले का? डोनाल्ड ट्रम्प यांनी आण्विक तळ नष्ट झाल्याचा केलेला दावा खरा आहे का? यासंदर्भातील आता मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात आण्विक तळांचं किती नुकसान झालं? याबाबत आता इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बागाई यांनी अल जझीराशी (आंतरराष्ट्रीय बातम्यांचं नेटवर्क) पुष्टी करताना म्हटलं की “आमच्या अणुस्थळांचं खूप मोठं नुकसान झालं हे निश्चित आहे.” या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर झालेल्या परिणामाची पहिल्यांदाच इराणने ही कबुली दिली आहे. पण इराणच्या अणुकेंद्राच्या नुकसानाबद्दल किंवा स्थितीबद्दल अधिक तपशील देण्यास इस्माइल बागाई यांनी नकार दिला.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर केलेल्या हल्ल्यात फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान हे तीनही आण्विक तळ नष्ट झाल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.
अमेरिकेचा इराणला पुन्हा इशारा
दरम्यान, अमेरिकेने इराणमधील तीन आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा केल्यानंतर आता इराणने पुन्हा आपल्या अणु सुविधांची पुनर्बांधणी सुरू केल्यास अमेरिकेने भविष्यात पुन्हा इराणवर हल्ला करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे यावर इराण पुन्हा एकदा आपली भूमिका मांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच दुसरीकडे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी दावा केला की, बी-२ बॉम्बर्सनी इराणी अणु केंद्रावर हल्ला केल्यानंतर ते तीनही आण्विक तळ नष्ट झाले आहेत.