West Bengal Riots over Waqf Amendment Act Murshidabad Burning : वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये चालू असलेल्या असलेल्या आंदोलनात गेल्या तीन-चार दिवसांपासून जाळपोळीचे प्रकार घडू लागले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मालदा, मुर्शिदाबाद, दक्षिण २४ परगणा आणि हुगळी जिल्ह्यात हिंसाचाराचे लोण पसरले. अनेक ठिकाणी दंगली होत आहेत. या दंगली रोखण्यासाठी व सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी कोलकाता उच्च न्यायालयाने दंगलग्रस्त भागात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रामुख्याने मुर्शिदाबादमधील स्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक शनिवारी सायंकाळी म्हणाले की “स्थिती आमच्या नियंत्रणात आहे”. दुसऱ्या बाजूला रविवारी सकाळी परत काही ठिकाणांवरून गोळीबाराच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. हल्लेखोऱांनी सीमा सुरक्षा दलाच्या पथकांवर हल्ले केले.

“धुलियान येथील ४०० हिंदूंना पलायन करावं लागलं आहे.”

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी दावा केला आहे. मुर्शिदाबादमधील धुलियान येथील कमीत कमी ४०० हिंदूंना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून पलायन करावं लागलं आहे. या स्थितीला राज्यातील ममता बॅनर्जी यांचं सरकार जबाबदार असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच ही स्थिती उद्भवली : शुभेंदू अधिकारी

शुभेंदू अधिकारी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे कट्टरपंथीयांना सूट मिळतेय आणि त्यांना हिंसा करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळेच ही हिंसा चालू असून ४०० हून अधिक हिंदूंना धुलियान सोडावं लागलं आहे. कट्टरपंथीयांच्या भितीमुळे त्यांना लालपूर हायस्कूल, देवनाकूप-सोवापूर जीपी, मालदा येथील बैसननगरमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

वक्फविरोधात आंदोलन करणाऱ्यांकडून रहिवाशांच्या पाण्या विष मिसळण्याची धमकी

भाजपाने म्हटलं आहे की “लालपूर हायस्कूलमध्ये किमान ५०० लोक पलायन करून आश्रयास थांबले आहेत. मालदा येथील स्थानिक रहिवाशी पलायन करून आलेल्या हिंदूंची मदत करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हे पलायन चालू आहे. लोक सांगतायत की ते जीव मुठीत धरून पळून आले आहेत. आंदोलनकर्त्यांनी पाण्यात विष मिसळण्याची धमकी दिली आहे.”

पोलिसांकडून मदत मिळाली नाही : दंगलग्रस्त

शुभेंदू अधिकारी यांनी हिंसक आंदोलनाचे काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्यावरील आपबिती कथन करताना दिसतोय. तो म्हणाला दंगलखोरांनी त्याचं घर जाळून टाकलं आहे. पोलिसांनी त्याची मदत केली नाही. त्यामुळे तो पळून मालदा येथे आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal riots over waqf amendment act murshidabad burning suvendu adhikari claims 400 hindus forced to flee asc