सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त कार्यक्रमात भाजपा-तृणमूलच्या कार्यकर्त्यांत जुंपली; खासदारांच्या सुरक्षारक्षकांचा हवेत गोळीबार

घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस पुढे आले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट लाठीचार्ज सुरु केला. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात तातडीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीदिनी पश्चिम बंगालमध्ये मोठा गदारोळ झाला आहे. बंगालमधील भाटपाडा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपा खासदार अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांना हवेत गोळीबार करावा लागला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना १२५ व्या जयंती निमित्ताने वंदन करण्यासाठी आज तृणमूल आणि भाजपाचे कार्यकर्ते बैरकपूर येथे एकत्र जमले होते. यावेळी नेताजी यांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करण्यावरुन दोन्ही गटामध्ये वाद झाला. हा वाद इतका उफाळला की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भाजपा खासदार अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांना हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

घटनास्थळी भाजपा खासदार अर्जुन सिंह पोहोचल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरु झाली. अर्जुन सिंह दाखल होताच त्यांना लक्ष्य करण्यासाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केली, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. या दरम्यान अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार सुरु केला आणि त्यांना सुरक्षितस्थळी घेऊन गेले. हा गदारोळ जेव्हा झाला तेव्हा पोलीसही तिथेच होते, असं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस पुढे आले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट लाठीचार्ज सुरु केला. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात तातडीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. या घटनेदरम्यान अर्जुन सिंह यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, असा दावा भाजपाने केला आहे. तर अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांनी सातवेळा राउंड फायरिंग केली ते अतिशय चुकीचं होतं, अशी भूमिका तृणमूल काँग्रेसने मांडली आहे.

“रविवावारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आमचे आमदार पवन सिंह नेताजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले होते. तेव्हा तृणमूलच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या दिशेला गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच विटा फेकण्यात आल्या. त्यानंतर मी तिथे पोहोचलो तेव्हा माझ्यावरही हल्ला केला. पोलिसांच्या समोर सगळं घडत होतं. माझी गाडी फोडण्यात आली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: West bengal scuffle broke out between tmc and bjp supporters during an event on the 125th birth anniversary of netaji vsk

Next Story
बेरोजगार तरूणानं पैसे कमवण्यासाठी केला मॅट्रिमॉनिअल साईटचा वापर, खासगी फोटो लिक करण्याची धमकी देत महिलांची लूट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी