Eligibility Criteria for Ayushman Bharat Yojana : केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक योजना सुरू करण्यात आल्या. त्यापैकीच एक म्हणजे ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ होय. २०१८ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेला आता जवळपास सात वर्षे झाली आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या लोकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेता येतात.

आयुष्मान भारत योजनेचा मुख्य उद्देश देशातील १० कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना आरोग्य विमा प्रदान करणे आहे. पैशांअभावी ज्यांना ज्यांना चांगल्या आरोग्य सेवा मिळू शकत नाहीत, ते या योजनेंतर्गत उपचार घेऊ शकतात.

या योजनेत प्रत्येक कुटुंब दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा मिळतो. यात रुग्णालयात दाखल होणं, औषधं आणि निदान करण्यासाठी येणारा खर्च याचा समावेश असतो.

आयुष्मान भारत योजनेबद्दल माहिती

आयुष्मान भारत योजनेला ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) असेही म्हणतात. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत, गरीब आणि गरजू कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जाते. गरीब कुटुंबांतील लाभार्थी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याला या योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते.

आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता

आयुष्मान भारत योजनेसाठी कच्चे घर असणारे लोक, भूमिहीन लोक, ग्रामीण भागात राहणारे लोक, तृतीयपंथी, दारिद्र्यरेषेखालील लोक , अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक (EWS) तसेच कमी उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकतात आहेत. जे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, मजुरी करून उदरनिर्वाह करतात ते सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांसाठी PMJAY चे पात्रता निकष काय आहेत?

पीएमजेएवायसाठी सामाजिक-आर्थिक पात्रता एसईसीसी-२०११ मधील डेटाच्या आधारे ठरवली जाते. ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना खालील निकष लागू होतात:

ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी पात्रता निकष:

  • कच्च्या घरात किंवा फक्त एकच खोली असलेल्या घरात राहणारी कुटुंबे.
  • ज्या कुटुंबांमध्ये १६ ते ५९ वयोगटातील कोणताही प्रौढ पुरुष कमावणारा नाही.
  • ज्या कुटुंबांमध्ये कमीत कमी एक अपंग सदस्य आहे आणि कमावणारा कोणताही प्रौढ सदस्य नाही.
  • अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) समुदायातील कुटुंबे.
  • भूमिहीन कुटुंबे जी उपजीविकेसाठी मजुरीवर अवलंबून असतात.

शहरी कुटुंबांसाठी पात्रता निकष:

  • घरगुती कामगार
  • रस्त्यावर साहित्य विकणारे
  • स्वच्छता कामगार
  • बांधकाम मजूर
  • वाहतूक कामगार (ड्रायव्हर, कंडक्टर आणि रिक्षाचालक)

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पात्रता निकष

१२ सप्टेंबर २०२४ रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी पीएमजेएवाय योजनेच्या विस्ताराला मंजुरी दिली. त्यांच्या पात्रतेचे निकष जाणून घेऊयात.

  • या योजनेअंतर्गत, ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती काहीही असो, ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल.
  • यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यसेवेसाठी लागणारा आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होईल.
  • ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, जे आधीच एबी पीएम-जेएवाय अंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबातील आहेत, त्यांना दरवर्षी केवळ स्वतःसाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल. हे कव्हर ७० वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह सामायिक करण्याची आवश्यकता नाही.
  • खासगी आरोग्य विमा असलेले ज्येष्ठ नागरिक त्यांच्या विद्यमान कव्हरसह या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • CGHS, ECHS किंवा आयुष्मान CAPF सारख्या इतर सार्वजनिक आरोग्य योजनांमध्ये नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या विद्यमान कव्हरेज आणि नवीन आयुष्मान भारत आरोग्य विम्यापैकी एक निवडावी लागेल.
  • योजनेचे फायदे सहज उपलब्ध व्हावेत यासाठी सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र आरोग्य कार्ड दिले जाते.