Goa Temple Stampede : गोव्यामधील शिरगावमधील श्री लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १५ पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या भाविकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत चौकशी केली.
या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. तसेच गोव्याचे डीजीपी आलोक कुमार आणि उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांनी लैराई देवी मंदिरातील घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. दरम्यान, लैराई देवीच्या यात्रोत्सवात चेंगराचेंगरीची घटना नेमकं कशामुळे घडली? याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
चेंगराचेंगरी कशामुळे झाली?
लैराई देवीच्या यात्रोत्सवात चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, “लैराई देवीच्या या उत्सवासाठी तब्बल ३० ते ४० हजार भाविक एकत्र जमले होते. मात्र, यापैकी काही भाविक मंदिराजवळ असलेल्या उतारावर उभे होते. उतारावर उभे असलेले काही भाविक पडले आणि त्यातील काही जण एकमेकांवर पडले, गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरीची घटना घडली”, अशी माहिती पीटीआयशी बोलताना सांगितली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी होणार?
लैराई देवीच्या यात्रोत्सवात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. घटनास्थळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटलं की, “मी या घटनेची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत चौरशी केल्यानंतर आम्ही अहवाल सार्वजनिक करू”, असं मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलं आहे.
VIDEO | Visuals from Sree Lairai Devi temple in Shirgao village where a stampede broke out during a temple festival in North Goa in the wee hours of Saturday.
— Press Trust of India (@PTI_News) May 3, 2025
(Source: Third Party)#Goa #GoaStampede pic.twitter.com/qtCn4ReIMb
गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की, “ही दुर्दैवी घटना आहे. आमची संपूर्ण टीम रात्रभर मदतकार्य करत होती. अनेकजण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.” दरम्यान, या घटनेनंतर गोवा सरकारने पुढील तीन दिवसांचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.