Donald Trump Tariff Impact On India : गेल्या काही दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी लावलेल्या टॅरिफची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी भारतावर २४ टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा केली आहे. दरम्यान जर भरताने उर्वरित आर्थिक वर्ष २०२६ मध्ये रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवलं तर इंधनाचे बिल हे तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ९ अब्ज डॉलर्सने वाढेल आणि हा खर्च आर्थिक वर्ष २०२७ मध्ये ११.७ अब्ज डॉलर्सवर जाईल, अशी माहिती एसबीआयच्या एका अभ्यासात समोर आली आहे.
अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादल्यानंतर हा रिपोर्ट समोर आला आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की जोपर्यंत शुल्कावरील वाद मिटत नाही तोपर्यंत भारताबरोबर कोणतीही व्यापार वाटाघाटी होणार नाही.
व्हाइट हाऊसने बुधवारी एक कार्यकारी आदेश जारी करत भारतीय मालावर २५ टक्के आयातशुल्क लादले आहे, यामुळे भारतीय मालावर एकूण शुल्क हे ५० टक्क्यांवर गेले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
रशियन तेलाचे भारतासाठी महत्व
२०२२ पासून भारताची रशियन खनीज तेलाची गरज वाढली आहे. भारत आयात करत असलेल्या एकूण तेलामध्ये रशियन तेलाचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२० मध्ये १.७ टक्के होते ते आर्थिक वर्ष २०२५ मध्ये वाढून ३५.१ टक्के झाले आहे. यामुळे रशिया हा भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी मॉस्कोवर निर्बंध घातले आणि त्यांच्याकडून तेल खरीदी बंद केली. यानंतर रशियन तेलाच्या किंमती या ६० डॉलर प्रति बॅरल पर्यंत मर्यादीत दरासह तेल उपलब्ध असल्याने भारताने रशियाकडून तेल खरीदी वाढवली.
आर्थिक वर्ष २५ मध्ये भारताने एकूण २४५ दशलक्ष मेट्रिक टन कच्चे तेल आयात केले, ज्यापैकी रशियाकडून ८८ दशलक्ष मेट्रिक टन (MMT) कच्चे तेल आयात करण्यात आले असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
युक्रेन युद्धापूर्वी इराक हा भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार होता, त्यानंतर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचा क्रमांक होता.
रशियाकडून तेल घेणं थांबवलं तर काय होईल?
“जर भारताने उर्वरित आर्थिक वर्ष २०२६ मध्ये रशियाकडून तेलाची आयात करणे बंद केले तर भारताचे इंधन बिल ९ अब्ज डॉलर्सनी वाढू शकते,” असे एसबीआयच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
याचा थेट परिणाम म्हणजे आपल्याला इतर देशांकडून अधिक महागडे तेल विकत घ्यावे लागेल. रशियाचा जागतीक कच्च्या तेलाच्या बाजारातील वाटा हा १० टक्के आहे. यामुळे जर सर्वच देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले आणि इतर कोणत्या देशांने त्यांचे उत्पन्न वाढवले नाही तर अशा स्थितीत जगभरात कच्च्या तेलाच्या किमती १० टक्क्यांनी वाढू शकतात.
भारताची रणनिती काय आहे?
आयातीचे बिल वाढण्याची शक्यता असली तरी एसबीआयच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारताचे वैविध्यपूर्ण पुरवठा जाळे आणि इतर तेल उत्पादक देशांशी असलेले संबंध यांची मदत याचा परिणाम कमी करण्यास मदतीची ठरेल.
भारत हा जवळपास वेगवेगळ्या ४० देशांकडून तेल खेरदी करतो, ज्यामध्ये नवीन पुरवठादार जसे की गुयाना, ब्राझील आणि कॅनडा यांचा समावेश आहे.
याबरोबरच भारतीय रिफायनरींचे पारंपारिक मध्य पूर्वेतील उत्पादक देशांशी वार्षिक करार देखील आहेत, ज्यामुळे विनंतीवरून त्यांच्याकडून महिन्याला अतिरिक्त पुरवठा होऊ शकतो, असे एएनआयने वृत्त दिले आहे.
रशियावर निर्बंध लादल्यापासून, रिफायनऱ्यांकडून अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि अझरबैजानमधील कच्च्या तेलाच्या पुरवठादारांकडेही लक्ष केंद्रित केले आहे.
तरीही एसबीआयने रिपोर्टमध्ये इशारा दिला आहे की जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारताच्या इंधनाच्या किमतींवर दबाव वाढेल.