what if Donald Trump did not get Nobel Peace prize Norway leaders raise concern : यंदाचे म्हणजेच २०२५ सालचे शांततेचे नोबेल कोणाला मिळणार याचा निर्णय आज, १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे आणि याचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. या वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या घोषणेसाठी काही तास शिल्लक आहेत आणि यादरम्यान नॉर्वेजियन नेत्यांना हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना दिला गेला नाही तर काय होईल याची धास्ती लागल्याचे दिसून येत आहे.

नॉर्वेजियन नोबेल कमिटीने गुरुवारी स्पष्टपणे सांगितले की, २०२५ च्या शांतता पुरस्काराचा विजेता कोण असेल याबद्दलचा त्यांचा निर्णय सोमवारीच झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा प्लॅनवर इस्रायल आणि हमास यांच्यात सहमती होण्याच्या काही दिवस आधीच हा निर्णय घेण्यात आला होता.

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, टाईमफ्रेम आणि पाच सदस्यांच्या स्वातंत्र्य समिती रचना लक्षात घेतली तर, बहुतेक नोबेल तज्ज्ञ आणि नॉर्वेजियन तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मात्र यामुळे उघडपणे डावलले गेल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय असेल या विचाराने सध्या देशात भीतीचे वातावरण आहे.

नॉर्वेच्या नेत्यांना चिंता

यादरम्यान नॉर्वेच्या सोशलिस्ट लेफ्ट पक्षाच्या नेत्या आणि परराष्ट्र धोरण प्रवक्त्या किर्स्टी Bergstø याबाबत म्हणाल्या की नॉर्वेने कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहिले पाहजे. “डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला टोकाच्या दिशेने घेऊन जात आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करत आहेत, दिवसाढवळ्या मास्क घातलेले गुप्त पोलिस लोकांचे अपहरण करत आहेत आहेत, संस्था आणि न्यायालयांवर दबाव टाकला जात आहे. जेव्हा राष्ट्राध्यक्ष इतके अस्थिर आणि हुकूमशाही असतात, तेव्हा नक्कीच आपण कोणत्याही गोष्टीसाठी तयार असायला हवे,” असे Bergstø द गार्डियनशी बोलताना म्हणाल्या.

“द नोबेल कमिटी ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि नॉर्वेजियन सरकारचा पुरस्कार निश्चित करण्यात कोणताही सहभाग नाही. पण ट्रम्प यांना हे माहिती असल्याबद्दल मी खात्रीने सांगू शकत नाही. त्यांच्याकडून कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला तयार राहावे लागेल,” असेही त्या म्हणाल्या.

डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे की त्यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा. हा सन्मान यापूर्वी त्यांच्या आधी राष्ट्रध्यक्ष राहिलेल्या बराक ओबामा यांना २००९ मध्ये प्रदान करण्यात आला होता. जुलै महिन्यात ट्रम्प यांनी कथितपणे नोबेल पुरस्काराबद्दल चौकशी करण्यासाठी नॉर्वेचे अर्थमंत्री आणि नाटोचे माजी सेक्रेटरी जनरल जेन्स स्टोल्टेनबर्ग यांना फोन केला होता. तसेच गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रामध्ये (UN) ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी सात कधीही थांबू न शकणारी युद्धे थांबवली आहेत.ज्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे.

भीती घालून पुरस्कार मिळत नाहीत….

नॉर्वेच्या ग्रीन पक्षाचे नेते अरिल्ड हर्मस्टॅड (Arild Hermstad) म्हणाले की, नोबेल कमिटीचे स्वातंत्र्य हेच या पुरस्काराला त्याची विश्वासार्हता देते. “शांतता पुरस्कार हे सातत्यपूर्ण वचनबद्धतेतून मिळवले जातात, सोशल मीडियावरील लहान मुलांप्रमाणे केलेल्या हट्टांमधून किंवा भीती घालून मिळत नाहीत,” असे ते म्हणाले. “ट्रम्प यांनी नुकतेच झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाला पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आहे. गाझामधील वेदना संपवण्यासाठी घेतलेला कोणताही निर्णय स्वागतार्ह आहे. पण उशीरा दिलेले योगदान हे वर्षानुवर्षे सुरू असलेली हिंसाचार आणि विभाजन पुसून टाकत नाही,” असेही ते म्हणाले.

ट्रम्प काय म्हणाले होते

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही तर हा त्यांच्या देशाचा म्हणजेच अमेरिकेचा अपमान ठरेल असे म्हटले आहे. ते म्हणाले “मी माझ्या अध्यक्षपदाच्या आतापर्यंतच्या सात महिन्यांच्या कार्यकाळात सात युद्ध रोखली आहेत.” हा दावा त्यांनी ५० हून अधिक वेळा केला आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा त्याच दाव्याचा पुनरुच्चार करत शांततेच्या नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे. यासह ते म्हणाले, “इस्रायल व हमासमधील युद्ध थांबल्यानंतर हे माझं आठवं यश असेल. मी रोखलेलं हे आठवं युद्ध असेल.”

यावेळी अमेरिकन जनतेला उद्देशून ट्रम्प म्हणाले होते की, “आपण सात महिन्यांमध्ये सात युद्ध रोखली आहेत. आता इस्रायल व हमासमधील युद्ध थांबवण्यात आपल्याला यश मिळेल असं दिसतंय. म्हणजेच आठ महिन्यात आठवं यश. तरी देखील मला नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.”

“भारत-पाकिस्तानसारखी युद्ध आपण रोखली, एवढं करूनही आपल्याला नोबेल पुरस्कार मिळेल का? अजिबात नाही. हा पुरस्कार अशा एखाद्या व्यक्तीला दिला जाईल ज्याने काहीही केलेलं नसेल. असं झाल्यास हा आपल्या देशाचा मोठा अपमान असेल. मला हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी हवा आहे. कारण असं यापूर्वी कधीही घडलेलं नाही,” असेही ट्रम्प म्हणाले होते.