James Comey post on Donald Trump: अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशनचे (FBI) माजी संचालक जेम्स कोमी यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे अमेरिकेत वाद निर्माण झाला आहे. समुद्रकिनारी शिंपल्याच्या सहाय्याने ८६४७ हा क्रमांक तयार करण्यात आल्याचा एक फोटो कोमी यांनी शेअर केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना संपविणे हा या क्रमांकाचा संकेत असू शकतो, असा कयास अनेक सोशल मीडिया युजर्सनी लावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१७ साली जेम्स कोमी यांची एफबीआयमधून हकालपट्टी केली होती. जेम्स कोमी यांच्या पोस्टवर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी सदर फोटो डिलीट केला आहे. तसेच त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत सदर फोटो पोस्ट करण्यामागे कोणताही इतर हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे.

इन्स्टाग्रामवरील नव्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “मी सकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारत असताना मला काही शिंपले किनाऱ्यावर आढळून आले. त्याचा फोटो मी शेअर केला आणि त्यातून राजकीय संदेश दिला जात असल्याचा अंदाज बांधला गेला. काहींना या क्रमाकांचा संबंध हिंसाचाराशी लावला. मी हिंसाचाराचा विरोध करतो, त्यामुळे ही पोस्ट डिलीट केली आहे.”

८६४७ याचा अर्थ काय?

अमेरिकेत ८६ या क्रमाकांचा विशिष्ट अर्थ आहे. ज्याचा अर्थ होतो काढून टाकणे, संपविणे किंला हटविणे. दरम्यान ४७ चा अर्थ काहींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लावला. ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष आहे. यावरून ४७ व्या राष्ट्राध्यक्षाला बाजूला करा, असा या क्रमाकांचा अर्थ लावला गेला.

जेम्स कोमींवर टीका

दरम्यान आता जेम्स कोमी यांच्यावर ट्रम्प यांचे सहकारी आणि कुटुंबिय टीका करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने म्हटले की, माझ्या वडिलांना मारून टाका, असे जेम्स कोमी सहज बोलून गेले. डेमोक्रेटिक पक्ष आणि माध्यमांमधील लोकांचे हे षडयंत्र आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकारी लॉरा लूमर यांनीही जेम्स कोमी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये ८६४७ या क्रमाकांचा उल्लेख केला. यावरून त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याची धमकी दिली आहे.

पोस्टची चौकशी होणार

होमलँड सिक्युरिटीच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी सांगितले की, गुप्त वार्ता विभाग आणि डीएचएस कडून जेम्स कोमी यांच्या पोस्टची चौकशी केली जात आहे.