कट्टर हिंदुत्त्ववादी नेता अशी प्रतिमा असलेले योगी आदित्यनाथ यांचा लोकसभेत रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २००७ मध्ये जातीय सलोखा बिघडवल्याप्रकरणी आदित्यनाथ यांना अटक झाली होती. तुरुंगात अत्याचार झाल्याचा आरोप करताना आदित्यनाथ यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

कट्टर हिंदुत्त्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाणारे योगी आदित्यनाथ हे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. रविवारी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोशल मीडियावर सध्या योगी आदित्यनाथ यांचीच चर्चा असून आदित्यनाथ यांचा लोकसभेत रडतानाचा एक व्हिडीओदेखील आता व्हायरल झाला आहे.

२००७ मध्ये आदित्यनाथ हे लोकसभेत रडल्याने चर्चेत आले होते. मुलायमसिंह यादव यांनी टार्गेट केल्याचा आरोप आदित्यनाथ यांनी केला होता. जातीय सलोखा बिघडवल्याप्रकरणी आदित्यनाथ ११ दिवस तुरुंगात होते. तुरुंगातून सुटल्यावर आदित्यनाथ हे लोकसभेत आले होते. तुरुंगात आलेला अनुभव सांगताना आदित्यनाथ लोकसभेतच रडले होते. शेवटी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी आदित्यनाथ यांची समजूत काढून याप्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे या व्हिडीओत दिसते.

कडव्या भूमिकेमुळे योगी आदित्यनाथ यांनी आजवर अनेकवेळा पक्षाविरोधात बंडाची भूमिका घेतली. मात्र गोरखपूरमधील त्यांची ताकद पाहता भाजपलाही त्यांच्या विरोधात जाणे शक्य झाले नाही. २००२ मध्ये त्यांनी हिंदू वाहिनीची स्थापना केली. २००५ मध्ये ख्रिश्चनांना पुन्हा धर्मात आणण्याच्या मोहिमेत ते सहभागी झाले होते. यावेळी १८०० ख्रिश्चनांनी पुन्हा हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. सन २००७ मध्ये जातीय सलोखा बिघडवला म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ हिंसाचार झाला होता. २००६ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी त्यांनी गोरखपूरमध्ये हिंदू संमेलन आयोजित करून पक्षालाच आव्हान दिले होते. २००७ मध्ये समर्थकांना उमेदवारी देण्यावरून त्यांचा पक्षाशी वाद झाला होता.