“मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरु झाल्या आहेत. मी आजवर अनेकदा चीनकडून येणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना या सरकारला दिली आहे. मात्र मोदी सरकार झोपेत आहे. चीनने जी नवी खेळी केली आहे ती भारतासाठी धोकादायक ठरू शकते.” असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. यासाठी त्यांनी संदर्भ घेतला आहे तो ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीचा. चीनने काराकोरमला कमी वेळात पोहचण्यासाठी एक नवा रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. हा रस्ता भारताची डोकेदुखी ठरु शकतो या आशयाची ही बातमी आहे. यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

भारताविरोधात आपलं बळ वाढवण्यासाठी चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीने अर्थात पीएलएने अक्साई चीन आणि काराकोरम यांच्याजवळ एक रस्ता बांधण्यास सुरुवात केली आहे. हा रस्ता भारतासाठी डोकेदुखी ठरु शकतो. त्यावरुन आता राहुल गांधी यांनी मोदी सरकार झोपेत असल्याची टीका केली आहे.

करोनावरुनही राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका
देशभरातातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांत देशात २५ हजार १५३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. नव्या रुग्णसंख्येसह एकूण संख्या १ कोटी ४५ लाख १३६ वर पोहचली आहे. देशात सध्या ३ लाख ८ हजार ७५१ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्येनं १ कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर राहुल गांधींनी ट्विट करत लॉकडाउनवरून टीकास्त्र डागलं आहे. जवळपास दीड लाख मृत्यूसह देशातील करोना बाधित रुग्णांची १ कोटी झाली आहे. पंतप्रधानांनी २१ दिवसांत करोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, अनियोजित लॉकडाउनमधून ते साध्य झालं नाही. पण, देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं,” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारने लागू केलेल्या लॉकडाउनवर टीका केली आहे.