काही देशांमध्ये करोनाची आणखी एक लाट येऊ शकते असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे. “काही देशांमध्ये करोना विषाणूचा व्हेरिअंट असणाऱ्या ओमायक्रॉनच्या XBB सबव्हेरियंटसह संक्रमणाची दुसरी लाट येऊ शकते असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

करोनाचे नवे व्हेरियंट वैद्यकीयदृष्ट्या अधिक गंभीर असल्याचं सूचित करण्यासंबंधी आतापर्यंत कोणत्याही देशाकडून माहिती उपलब्ध झाली नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की “ओमायक्रॉनचे जवळपास ३०० सबव्हेरियंट आहेत. यामधील XXB हा सध्या चिंता वाढवणारा आहे. हे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवरही मात करु शकतात. त्यामुळे काही देशांमध्ये XXB मुळे करोनाची आणखी लाट येऊ शकते”.

स्वामीनाथन यांनी यावेळी आम्ही BA.5 आणि BA.1 यांच्या मुख्य कारणांचा मागोवा घेत असल्याचं सांगितलं आहे. विषाणू ज्याप्रमाणे विकसित होत जाईल त्याप्रमाणे तो अधिकाधिक संक्रमित होईल असंही त्या म्हणाल्या. नवे सबव्हेरियंट अती-धोकादायक असल्याची माहिती अद्याप कोणत्याही देशाकडून आली नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

Covid 19: करोना अद्यापही संपलेला नाही, WHO चं मोठं विधान; जाणून घ्या पाच महत्त्वाचे मुद्दे

डॉक्टर स्वामीनाथन यांनी यावेळी लक्ष ठेवणं तसंच माहिती ठेवणं या महत्त्वाच्या गोष्टी असल्याचं सांगितलं. करोना ही अद्यापही जागतिक आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जगभरात आठवड्याला आठ ते नऊ हजार लोकांच्या मृत्यूची नोंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“आम्ही करोना साथ संपली असं सांगितलेलं नाही. याचा अर्थ आपल्याला सर्व काळजी घ्यायची असून साधनांचा वापर करायचा आहे. आता आपल्याकडे अनेक साधनं तसंच लसी उपलब्ध आहेत ही चांगली बाब आहे,” असं त्यांनी सांगितलं. लोकांनी संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करा असा सल्ला त्यांनी दिला आहे.