सोशल मीडियात एखादी गोष्ट व्हायरल झाली की, त्याला तुफान प्रतिसाद मिळतो. हैदराबादमधील ‘कुमारी आंटी’ नावाचा स्टॉल सोशल मीडियामुळे लोकप्रिय झाला. त्यानंतर स्टॉलसमोर खवय्यांची गर्दी वाढू लागली. गर्दीमुळे वाहतुकीची समस्या उद्भवल्यानंतर पोलिसांनी सदर स्टॉल बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या या आदेशानंतर सोशल मीडिया स्टार कुमारी आंटीचा स्टॉल वाचविण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पोलिस महासंचालक आणि शहर विकास मंत्रालयाला निर्देश देऊन स्टॉलवर बंदी घालण्याचा निर्णय मागे घेण्यास सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबादच्या माधापूर येथे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी रैदुराम वाहतूक पोलिसांनी कुमारी आंटीचा स्टॉल हटविला. तसेच त्यांनी इतर ठिकाणी स्टॉल लावावा, असे सांगितले. माधापूरच्या आयटीसी कोहेनूर चौकात हा स्टॉल असून भात, चिकन, मटण आणि इतर मासांहारी पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची एकच गर्दी याठिकाणी उसळते. खवय्यांच्या गर्दीमुळे याठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.

सोशल मीडियातील व्हिडिओमुळे स्टॉलवर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या पादचाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कुमारी आंटीच्या स्टॉलवर कारवाई केली होती. पोलिसांच्या कारवाईनंतर कुमारी आंटी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. मागच्या १३ वर्षांपासून मी याठिकाणी व्यवसाय करत आहे. फक्त सोशल मीडियावर लोकप्रिय झाले म्हणून माझ्या स्टॉलवर बंदी आणली, यामुळे माझ्या पतीला मनस्ताप झाला आहे, असे कुमारी आंटी यांनी सांगितले.

पोलिसांच्या कारवाईनंतर वायएसआर काँग्रेसने प्रतिक्रिया दिल्यानंतर या वादाला राजकीय स्वरुप मिळाले. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि पवन कल्याण यांचा जन सेना पक्षाने कुमारी आंटीचा स्टॉल बंद पाडला, असा आरोप आंध्र प्रदेशमध्ये सत्ता असलेल्या वायएसआर काँग्रेसने केला. कुमारी आंटी स्टॉलच्या चालक साई कुमारी यांना आंध्र प्रदेशच्या जगनमोहन रेड्डी सरकारने घरकुल दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप वायएसआर काँग्रेसने केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is kumari aunty hyderabad cops shut popular food stall cm revanth reddy intervenes kvg