श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांना फसवून स्वतः ऐश आरामात राहणार्‍या ४५ वर्षीय रोहन सालदान्हा याला मंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने तब्बल २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा आरोपी जगत असलेल्या रहाणीमानामुळे याच्यावर अनेक महिन्यांपासून पोलिसांना संशय होता.

सालदान्हा हा स्वत:ला एक हाय-प्रोफाईल बिझनेसमेन असल्याचे सांगायचा आणि त्या भागाच्या बाहेरील लोकांना लक्ष्य करत असे. इतकेच नाही तर तो इतर राज्य आणि जिल्ह्यातील लोकांना लक्ष्य करत होता. हा संभावित पीडितांना त्याच्या जेप्पीनामोगारू येथील पॉश बंगल्यात बोलवून घ्यायचा. येथील वातावरण, महागडी मद्य आणि अत्यंत सभ्य वर्तनामुळे त्याच्यावर लोक विश्वास ठेवत असत.

समाजातील प्रतिमा आणि त्याचे उद्योगांसंबधीत माहिती यामध्ये तफावत आढळून आल्यानंतर मंगळुरू पोलिसांनी तपास सुरू केला. या आरोपीची चौकशी केली असता एक मोठं फसवणुकीचं रॅकेट उघडकीस आलं. ही फसवणूक ही मानसिक दिशाभूल आमि लक्झरी जीवनशैलीचं अमिष दाखवून केली जात असे. सालदान्हाने पीडितांना ५० कोटी ते १०० कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन फसवल्याचे सांगितले जात आहे.

पण त्याच्या आधी त्याने कर्जाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्याच्या पीडितांकडून स्टॅम्प ड्युटी म्हणून ५ कोटी ते १० कोटी रुपये आधीच घेतले. त्याचं भव्य गर आणि त्याचं गोड बोलणं यावर विश्वास ठेवून अनेक उद्योजकांनी त्याला मोठ्या प्रमाणात रोखीने पैसे दिले. यापैकी बऱ्याच जणांना तर त्याची पार्श्वभूमी तपासावी किंवा कायदेशीर गॅरंटी घ्यावी अशी गरजही वाटली नाही.

अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत सलदान्हा याने असे फसवेगिरी करून किमान ४५ कोटींचे व्यवहार केले. तर गेल्या अनेक वर्षात झालेल्या फसवणूकीचा आकडा का २०० कोटींपेक्षा जास्तचा आहे. त्याने फसवलेल्या लोकांमध्ये सहज पद्धतीने कर्ज मिळेल या अपेक्षेने आलेल्या अनेक प्रभावशाली उद्योजकांचा समावेश आहे.

सालदान्हाने नुकतेच फसवलेल्या एका व्यक्तीने तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना एक तळघर आढळून आले. ही जागा आपत्कालीन परिस्थितीत लपण्यासाठी तयार केलेली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना दरवाजा तोडून आत प्रवेश करावा लागला.

प्रशसानकडून त्याचे आर्थिक रेकॉर्ड तपासले जात आहे आणि हा तपास सुरू झाल्यानंतर आणखी पीडित समोर येऊ शकतात असे सांगितले जात आहे. सालदान्हा याने आणखी कोणाला फसवले असेल तर त्याने पुढे येऊन जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.