Kerala nurse Nimisha Priya in Yemen : भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये फाशी देण्यात येणार होती. मात्र, निमिषा प्रियाला दिली जाणारी फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत नर्स निमिषा प्रियाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पण निमिषा प्रियाची ‘येमेन’मधील फाशी थांबवण्यासाठी ‘ग्रँड मुफ्ती’ यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र, निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी महत्त्वाची भूमिका बजाववल्याचं बोललं जात आहे.

कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार यांना ‘ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया’ म्हणून देखील ओळखलं जातं. दरम्यान, निमिषा प्रियाच्या येमेनमध्ये फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याबाबत सांगताना ‘ग्रँड मुफ्ती’ यांनी सांगितलं की, प्रियाला माफ करता येईल का? यासाठी तलाल अब्दो मेहदीच्या कुटुंबाशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, निमिषा प्रियाच्या फाशीच्या स्थगितीबाबत कंठापुरम यांनी सांगितलं की, “येमेनमध्ये पीडितांच्या कुटुंबाला खुन्याला माफ करण्याची परवानगी देणारा कायदा आहे. त्यामुळे आम्ही त्या पीडित कुटुंबाला ओळखत नसलो तरी येमेनमधील विद्वानांशी (येमेनमधील प्रमुख धर्मगुरू) संपर्क साधला आणि त्यांना कुटुंबाशी बोलण्याचं आवाहन केलं आहे”, असं कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

“येमेनमध्ये एक वेगळा कायदा आहे. जर खुन्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली तर पीडित कुटुंबाला माफी देण्याचा अधिकार आहे. हे कुटुंब कोण आहे हे मला माहित नाही. परंतु मी येमेनमधील संबंधित विद्वानांशी संपर्क साधला. मी त्यांना समजावून सांगितलं आहे. इस्लाम हा एक धर्म आहे जो मानवतेला खूप महत्त्व देतो”, असं कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं.

तसेच धार्मिक आधारावर संवाद सुरू असून येमेनमधील ‘ब्लड मनी’च्या माध्यमामातून माफीचा पर्यायाचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे यावर आता तलाल अब्दो मेहदीच्या कुटुंबीयांच्या निर्णयावर निमिषा प्रियाची फाशीचा पुढील निर्णय असणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

निमिषा प्रिया ही २००८ साली कामानिमित्त येमेन येथे गेली होती आणि तिचे कुटुंब केरळमध्येच होते. तिने २०१५ साली मेहदी याच्याबरोबर स्वतःचं क्लिनिक सुरू करण्यापूर्वी तिने इतर अनेक रुग्णालयांमध्ये काम केलं होतं. मेहदी हा तिचा स्थानिक पार्टनर होता. येमेनमध्ये पार्टनर म्हणून स्थानिक व्यक्तीला उद्योगात बरोबर घेण्यासंबंधीचा कायदा आहे.

येमेनमध्ये क्लिनिक सुरू करण्यासाठी निमिषा प्रिया हिने तलाल अब्दो मेहदीला बरोबर घेतलं. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि निमिषा प्रिया हिने मेहदीवर पैशांचा अपहार केल्याचा आरोप केला. यामधून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर निमिषा प्रियाचा पासपोर्ट मेहदीने घेतला. पासपोर्ट परत घेण्यासाठी प्रियाने कथितपणे त्याला सेडेटिव्हजचे इंजेक्शन दिले. पण त्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर येमेनमधून पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना निमिषा प्रियाला अटक करण्यात आली. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने निमिषा प्रियाला २०२० साली मृ्त्यूदंडाची शिक्षा दिली. तिच्या कुटुंबियांनी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि या निर्णयाला आव्हान दिलं होतं. पण २०२३ साली ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर तिला १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. पण आता पुढील आदेशापर्यंत ही फाशी पुढे ढकलण्यात आली आहे.